पगाराएवढे महाग तिकीट कोणाला परवडेल ? मुरलीधरनने पीसीबीला फटकारले

श्रीलंका सध्या आर्थिक संकटात आहे आणि अशा वेळी पाकिस्तान क्रिकेट मंडळा (पीसीबी)ने कोणताही अभ्यास न करता प्रचंड महाग ठेवलेले तिकिटांचे दर पाहून विश्वविक्रमी फिरकीवीर मुथय्या मुरलीधरनने त्यांना चांगलेच फटकारले. लोकांच्या महिनाभराच्या पगाराएवढं तिकीट ठेवलं तर ते कुणाला परवडेल? असा सवाल करत लंकेच्या परिस्थितीचा कोणताही आढावा न घेताच ठेवलेल्या दरांमुळेच हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा ब्लॉकबस्टर सामना रिकाम्या खुर्च्यांनिशी पाहावे लागले.

‘हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभावा म्हणून सामन्यासाठी राखीव दिवसाचेही नियोजन करण्यात आले. तरीही पीसीबीच्या वाढीव तिकीट दरामुळे श्रीलंकन क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे फिरकलेच नाहीत. ‘पीसीबी’च्या बेजबाबदापणामुळेच आशिया चषक स्पर्धेला थंडा प्रतिसाद मिळत असल्याची टीका क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. तिकिटाच्या किमती या क्रिकेटप्रेमींच्या खिशाला न परवडणाऱ्या आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याच्या काही वेळ आधी तिकीट दर कमी करण्यात आले, मात्र याचा काही उपयोग झाला नाही. श्रीलंकेत आशिया चषकाचे तिकीट हे सहा हजार श्रीलंकन रुपयापासून सुरू होते. जर तुम्हाला ग्रॅण्ड स्टॅण्डमधून सामना पाहायचा आहे तर तुम्हाला 40 हजार ते 50 हजार श्रीलंकन रुपये मोजावे लागतील. हा तिकीट दर एका व्यक्तीच्या महिन्याच्या वेतनाएवढा आहे. श्रीलंकेत क्रिकेट सामन्याच्या तिकिटासाठी एवढे पैसे कोणी खर्च करू शकेल, असे मला वाटत नाही.’

श्रीलंकेत प्रथमच रिकामे स्टेडियम!
श्रीलंकेतील क्रिकेटप्रेमी हे भावनिक आहेत. त्यामुळे ते स्टेडियमवर जाऊन सामन्याचा मनमुराद आनंद घेत असतात. मात्र भरमसाट तिकीट दरामुळे यंदाच्या आशिया चषकादरम्यान श्रीलंकन क्रिकेटप्रेमींनी मैदानाकडे पाठ फिरवली आहे. शिवाय पावसाच्या वातावरणामुळेही काहींनी उगाच पैसे वाया जायला नको म्हणून तिकिटे काढली नाहीत, असेही मुरलीधरनने सांगितले.