प्रफुल्ल पटेल यांना टर्म संपण्याआधीच राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?

महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा चार वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पटेल यांना टर्म संपण्याआधीच राज्यसभेची उमेदवारी कशासाठी दिली, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान काही गोष्टी गुलदस्त्यात राहु द्या, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल हे 2022मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत जुलै 2028पर्यंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्याकडून राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही सभापतींकडून करण्यात आलेली नसल्याने राज्यसभेतील सदस्यत्वावरून आगामी काळात कायदेशीर गुंता निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्यानंतर ते आधीच्या सदस्यत्वाचा लगेच राजीनामा देतील. त्यामुळे त्यांच्या विरोधातील अपात्रतेची याचिका आपोआपच निकाली निघण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधिमंडळात असलेल्या पक्षीय बलाचा विचार करून अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली आहे. त्याच वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यसभेतील संख्याबळाचा विचार करता शरद पवार यांच्याकडे 3 तर अजित पवार गटाकडे 1 सदस्य आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र असताना पटेल हे राज्यसभेवर गेलेले असल्याने शरद पवार गटाकडून बजावलेला व्हीपच पटेल यांना लागू आहे. आधीचे सदस्यत्व कायम ठेवल्यास कायदेशीर गुंता वाढण्याची शक्यता अधिक आहे. ते टाळण्यासाठी पटेल यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

तटकरे म्हणतात… तांत्रिक कारणांमुळे निर्णय
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही तांत्रिक बाबींचा विचार करत प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. पटेल या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल. त्या रिक्त जागेवर मे महिन्यात पोटनिवडणूक लागेल. त्यावेळी इतर नावांचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पटेलांना अपात्रतेची भीती
राज्यसभेची प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले. या देशात असं कधी घडलं नव्हतं. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडून पटेल यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात येत आहे. यात ते अपात्र ठरतील, या भीतीमुळे अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.