अटलबिहारी वाजपेयींनी देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकीय साधनशुचिता बाळगणारे नेते होते. त्यांनी कायमच देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला. विविध प्रकारच्या विचारधारांचे कायमच स्वागत करत त्यांनी लोकशाहीला एकप्रकारची उंची गाठून देण्याचे काम केले. त्यामुळे अटलजींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली अशा शब्दांत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत वाजपेयींना आदरांजली वाहण्यात आली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी मंत्री आनंदराव नारायण देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव रामराव धोत्रे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधानसभा सदस्य कॉम्रेड माधवराव बयाजी गायककाड तसेच विधानसभा सदस्य केशकराव आत्माराम पारधी, वासुदेव आनंदराव देशमुख, शिवाजीराव नारायणराव नागवडे, वैजनाथराव यादकराव आवात, यादवराव कृष्णराव भोयर, लक्ष्मणराव विठोबा जाधव, वसंतराव विठोबा थोरात, विठ्ठलराव सहादू भैलुमे, वसंतराव बालाजीपंत इटवेलवार आणि विमल खंडेराव रांगणेवर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला.

‘छोटे मन से कोई बडा नही होता और टूटे मन से कोई खडा नही होता’, ‘गीत नया गाता हूँ’, ‘मौत से ठण गई, जूँजने का मेरा इरादा न था’ या अटलजींच्या कवितांच्या ओळींचे वाचन करून मुख्यमंत्री म्हणाले, अर्थकारण, परराष्टृधोरण, शेती, समाजकारण, राजकारण, संरक्षण, धर्म, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांत अटलजींनी मांडलेले विचार पथदर्शी व कालातीत ठरले. संवेदनशील हृदयाचे अटलजी प्रसंगी देशहितासाठी कठोर झाल्याचेही दिसून आले अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील मैत्रीचा धागा उलगडला.

शिवसेनाप्रमुखांच्या फोटोबायोग्राफी कार्यक्रमासाठी स्वतः जातीने वाजपेयी हजर होते. पोखरण येथे त्यांनी केलेल्या अणुचाचणीने जगभरात हिंदुस्थानचा दबदबा निर्माण झाला असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना प्रतोद नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सदस्य अजित पवार, गणपतराव देशमुख, छगन भुजबळ, अबू आझमी, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण यांनीही शोकप्रस्तावावर बोलताना माजी पंतप्रधान अटलजींना आदरांजली वाहिली.