विनापरवाना मासेमारी करणाऱ्या नौकांची नोंदणी रद्द होणार

विनापरवाना मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. याचा फटका कोकण विभागातील 13 हजार 156 नौकांना बसणार असून या मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार आहे. बेकायदेशीर मासेमारीला काही सरकारी अधिकारी पाठबळ देत असल्याचा सातत्याने आरोप केला जात होता. अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने आजपर्यंत अशी मासेमारी थांबली नव्हती असे म्हटले जात होते. मात्र आता आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे या लढ्याला यश आल्याची चर्चा मच्छिमारांमध्ये सुरू झाली आहे.

रिअल क्राफ्ट प्रणालीनुसार आतापर्यंतची नोंदणीकृत मासेमारी नौकांची संख्या 28 हजार 768 एवढी आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत 15 हजार 612 एवढ्याच नौकांनी मासेमारी करण्यासाठी परवाने घेतले आहेत. मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नौका व प्रत्यक्षात मासेमारी परवाने घेतलेल्या नौकांमध्ये खूप मोठी तफावत आहे.अशा नोंदणीकृत पण परवाना न घेतलेल्या नौकांपैकीच काही नौका बेकायदेशीर मासेमारी करतात. त्याची मत्स्य व्यवसाय खात्याने गंभीर दखल घेतली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या नौकांनी मासेमारी परवाना घेतला नसेल, अशा सर्व नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत.ठाणे-पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना तत्काळ याबाबत अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.नोंदणी रद्द करण्यात आलेल्या नौकांची यादी नेव्ही, कोस्ट गार्ड व सागरी पोलिसांना देण्यात येणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या नौका समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्या मालकांवर राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात यावी, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या