
विमानात साप किंवा उंदीर शिरल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण, विमान प्रवासात एका महिला प्रवाशाला विंचवाने दंश केल्याची भयानक घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान, विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.
ही घटना 23 एप्रिलची आहे. एअर इंडियाचे एआय 630 हे विमान नियोजित वेळेत नागपूरवरून मुंबईच्या दिशेने निघाले. उड्डाण भरल्याच्या काही मिनिटानंतर एका महिला प्रवाशाला विंचवाने दंश केला. महिलेची आरडाओरड ऐकताच फ्लाईट अटेंडंट तिथे पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली असता महिलेला विंचवाने दंश केल्याचे समजले. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत कंपनीची टीम तिच्यासोबत उपस्थित होती. तसेच आमच्या कर्मचाऱयांनी विमानाची तपासणी केली असता, त्यांना एक विंचूही आढळून आला. योग्य प्रक्रियेनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे एअर इंडियाने निवेदनात म्हटले आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात एअर इंडियाच्या एक्सप्रेस प्लेनच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळला होता. हे विमान दुबई विमानतळावर पोहोचल्यावर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळल्यामुळे विमानतळावर प्रवाशांचा बराचवेळ खोळंबा झाला होता.

























































