
सामना प्रतिनिधी । अलिबाग
ग्रामीण भागात शासकीय आणि खाजगी बँका पोहचल्या असल्या तरी पोस्ट खात्यावर लोकांचा आजही विश्वास आहे. मात्र रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात पोस्टातील कर्मचाऱ्यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. येथील कुडगाव येथील पोस्टाच्या शाखेत एका महिला कर्मचाऱ्याने 1 लाख 30 हजारांचा अपहार केल्याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडगाव येथे पोस्टाचे कार्यालय आहे. या पोस्टात गावातील 38 ग्राहकांनी आपल्या बचत खात्यात 19 जुलै 2018 ते 29 मार्च 2019 मध्ये 1 लाख 30 हजार रुपये कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याकडे जमा केले होते. पोस्ट खात्यात पैसे जमा केल्यानंतर महिलेने पासबुकमध्ये पैसे भरल्याची तारीख व किती पैसे भरले यांची नोंद शिक्का मारून दिली होती. मात्र जमा झालेल्या रकमेची नोंद शाखा कार्यालय खात्यात न करता,तसेच रक्कम शासन खात्यात जमा न करता शासनाची व खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. पोस्ट खात्याचे ऑडिटच्या वेळी ही बाब लक्षात आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.या प्रकरणी कार्यालयीन चौकशीत महिला आरोपी या दोषी आढळल्याने दिघी सागरी पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.






























































