
सामना प्रतिनिधी । मुंबई
किरकोळ ते गंभीर गुह्यात तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या महिला आता महिलांच्याच मदतीला धावून आल्या आहेत. मासिक पाळीच्या ‘त्या’ पाच दिवसांसाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू केले आहे. ‘म. का.’ ( महाराष्ट्र कारागृह) नावाने तयार केलेल्या या सॅनिटरी नॅपकिनच्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदुस्थानातील तुरुंगात पहिल्यादाच सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन केले जात आहे.
तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे आहेत, तर मुंबई, येरवडा आणि अकोला येथे महिला खुले जिल्हा कारागृह आहे. किरकोळ गुह्यातील महिला कैद्याची संख्या अधिक आहे. त्यांना मासिक पाळीच्या दिवसांत तुरुंगातील कॅण्टीनमधून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करावे लागत असायचे. याची गंभीर दाखल घेत तुरुंग प्रशासनाने घेतली. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील महिला विभागात सॅनिटरी नॅपकिन तयार करायला सुरुवात झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक राज वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी हा प्रकल्प गेल्या वर्षी सुरू केला. सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पासाठी दहा जणींची निवड करण्यात आली. त्यांना कटिंग ते पॅकिंग असे प्रशिक्षण देण्यात आले. दिवसाला दहा जणी मिळून 500- 700 सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करतात. विविध तुरुंगांतील महिलांच्या मागणीनुसार त्यांना या सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाते. या विभागाने आतापर्यंत 25 हजारांहून अधिक सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती केली आहे. सॅनिटरी नॅपकिन विभागाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांना खास प्रशिक्षण दिल्याची माहिती कारखाना व्यवस्थापक राणी भोसले यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचा महिलांच्या आरोग्यासाठी पुढाकार
मुंबई विद्यापीठाने महिलांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी या ठिकाणी सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. अतिशय कमी किमतीत विद्यार्थिनींना हे सॅनेटरी नॅपकिन्स उपलब्ध होणार आहेत. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांच्या प्रयत्नांतून विद्यापीठात हे मशीन बसविण्यात येणार आहे. विद्यापीठातील अनेक महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे सुट्टी घेऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले होते.




























































