
सामना प्रतिनिधी । अलिबाग
महिला दुर्बल असल्यामुळे त्यान आरक्षण दिले जाते. महिलाना आरक्षण नव्हे तर समान अधिकार मिळाले पाहिजेत. ते मिळवण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले.
अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तेजस्विनी पुरस्कारांचे गुरुवारी वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात वितरण करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे बोलत होत्या. अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यावेळी उपस्थित होते.
मतिमंद मुलांसाठी शाळा चालविणाऱ्या डॉ. सुरेखा पाटील, महिलांसाठी पतसंस्था सुरु करणाऱ्या मानसी कर्वे, महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या सुप्रिया नाईक, उदयोन्मुख गायिका भारती मढवी, आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या पुजा साठेलकर यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
आता युग बदलतय. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. मुली जबाबदारी स्वीकारत आहेत. परंतु अतंर्गत हेवेदावे आणि द्वेष महिलांच्या प्रगतीला बाधक ठरत आहेत. त्यामुळे महिलांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे डॉ. बैनाडे म्हणाल्या.
स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाक आहेत. त्यात ताळमेळ असणे गरजेच आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल तर महिलांची प्रगती नक्कीच होते, असे मत प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी व्यक्त केले.
काम सगळेच करतात. पण कौतुक करणारे थोडे असतात. कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते तेव्हा चांगले काम करण्याची उभारी मिळते, त्यामुळे आज वितरीत होणारे पुरस्कार इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरतील असे निवडणूक अधिकारी वैशाली माने म्हणाल्या.
महिलांना सहानुभूती नको आत्मविश्वास हवा आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याची गरज आहे अस मत चित्रलेखा पाटील यानी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन जबाबदारी महेश पोरे यांनी केले. आभारप्रदर्शन निखील म्हात्रे यांनी केले.
































































