ते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

ढगांशी स्पर्धा करीत पतंग बदविण्याच्या नादात आकाशात मुक्त विहार करणाऱ्या मुक्या जीवांचे पंख छाटले गेल्याने घायाळ झालेल्या बगळे, घार, कोकीळ, चंडोल, शराटी, कावळा, पारवा आदी पक्षांना नगरच्या “बर्ड हेल्प लाईन”ने दुसऱ्यांदा जीवन दिलं आहे.

अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडलेले असंख्य पक्षी या महिनाभरात पतंगाच्या मांजामुळे घायाळ होवून मृत्युमुखी पडतात अथवा जखमी होतात. काल झालेल्या संक्रात सणाच्या दिवशी बगळे, घार, कोकीळ, चंडोल, शराटी, कावळा, पारवा असे अनेक पक्षी घायाळ झाले त्यांच्यावर “बर्ड हेल्प लाईन”च्या नवीन दळवी, संदिप राठोड, राजेश काळे, भैरवनाथ वाकळे, रूषीकेश लांडे, बाळासाहेब डोंगरे, बावा सर, सुधीर दरेकर, सचिन चव्हाण, लक्ष्मण साखरे,डॉ. सुधाकर गीते आदींनी उपचार केले.

संक्रांतीच्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास मार्श हॅरीअर हा दुर्मिळ पक्षी मांजामुळे जखमी होवून पडलेला राहुरीतील पर्यावरणप्रेमी युवक विनायक वाघमारे व वैभव वाघमारे यांना आढळून आला. या तरूणांने हा पक्षी अतिशय काळजीपूर्वक आपल्या मोटारसायकलीवरून भिंगार येथील बर्ड हेल्प लाईन येथे जयराम सातपुते व शिवकुमार वाघुंबरे यांच्याकडे दाखल केला. पी.एफ.ए.चे डॉक्टर लक्ष्मण साखरे यांच्या मदतीने त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात यश आले.

मार्श हॅरीअर अर्थात पाणगरूड/ पाणघार नावाने ओळखला जाणारा हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून तो नेपाळ, श्रीलंका, अंदमान, मालदीव आणि लक्षद्वीप बेटे या ठिकाणाहून हिवाळ्यामध्ये हिंदुस्थानात येवून वास्तव करतो. असाच एक दुर्मिळ मोरशराटी पक्षीसुद्धा मांजामुळे घायाळ झालेला केडगाव येथील पर्यावरणप्रेमी नितीन अळकुटे यांना आढळून आला. त्यावरही बर्ड हेल्पलाईनच्या मार्गदर्शनाने उपचार सुरू आहेत.

जानेवारीत नगर जिल्ह्यात निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते व शिवकुमार वाघुंबरे यांच्या मार्गदर्शनाने निसर्गप्रेमी संघटनांच्या सहकार्याने पक्षीगणना व बर्ड हेल्पलाईन हे उपक्रम सुरू असतात. जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण प्रजातींच्या पक्षांच्या नोंदी घेणे व जखमी पक्षांवर उपचार करून त्यांना मुक्त करणे असे या कार्याचे स्वरूप आहे. असे जखमी पक्षी आढळल्यास 8788219973 अथवा 9604074796 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.