
सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पावसाचा फटका सहभागी संघांना बसत आहे. हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामधील गुरुवारची लढतही सतत पडणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. पावसामुळे निकाल न लागलेली या वर्ल्ड कपमधील ही चौथी लढत ठरली. याआधी पाकिस्तान-श्रीलंका, दक्षिण आफ्रिका – वेस्ट इंडीज, बांगलादेश-श्रीलंका या लढती रद्द करण्यात आल्या होत्या. हिंदुस्थान-न्यूझीलंड संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला असून न्यूझीलंडचा संघ सात गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून टीम इंडियाचा संघ पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसाने रद्द झाली. त्यामुळे संपूर्ण संघच निराश आहे. पण अशा परिस्थितीत न खेळलेलेच बरे. आमचा संघ चांगला खेळ करतोय. ओलसर मैदानावर खेळाडूला दुखापत झाल्यास पुढच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो. आता आमचे लक्ष्य पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर असणार आहे, असे मत कर्णधार विराट कोहली याने यावेळी व्यक्त केले.
पावसाचा व्यत्यय सात संघांच्या लढतीदरम्यान आलाय. यामध्ये हिंदुस्थान, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व अफगाणिस्तान या तीन देशांच्या लढतीदरम्यान अद्याप पावसाने खेळखंडोबा केलेला नाही.




























































