
अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]
लेखिका स्वाती चांदोरकर…
व. पु. काळेंची कन्या या छान ओळखीव्यतिरिक्त स्वातीने खूप संघर्षाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे..
‘कॅन्सर झाला, तीन ऑपरेशन्स झाली, पण मी किमो नाकारली. कारण मला असं वाटत होतं की, गरजच नाहीये मला किमोची. डॉक्टर म्हणाले, किमो घेतली नाही तर फार तर अडीच वर्षे आयुष्य! मग मात्र ठरवलं, आजपर्यंत आर्थिक अडचणींमुळे अनेक नोकऱया केल्या. नंतर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करताना घरात सतत बंदिस्त होऊन राहिले. आता मात्र मनाला हवं तसं जगायचं. राजस्थान टूरला गेले मग मुलीबरोबर. झाली या घटनेला 10 वर्षे.’’ स्वाती चांदोरकर यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्या आयुष्याला उलगडणाऱया गप्पांच्या ओघात अनेक चढ-उतारांचा, अडचणींचा, चुकांचा आणि त्यावर उत्तर शोधताना झालेल्या जाणिवांचा एकेक स्तर मोकळा होत गेला.
सगळ्यांनाच प्रिय असणाऱया व. पु. काळेंची मुलगी या ओळखीबरोबरच स्वतंत्र लेखनशैलीमुळे आणि विषयांच्या वेगळेपणामुळे स्वत:ची ओळख निर्माण करणाऱया स्वाती चांदोरकर पहिल्याच भेटीत ‘अहो-जाहो’चा अडसर बाजूला सारत ‘अगं-तुगं’च्या पातळीवर आल्या तेव्हाच कळलं होतं, हा मैत्रीचा धागा पक्का करणाऱया गप्पा आता मस्त रंगणार! ‘‘सध्या एखादा रोल केला तरी स्वत:ला सेलिब्रिटी समजतात लोक, पण बापूंनी (व. पु. काळे) आपण कोणी लेखक वगैरे आहोत असं कधी जाणवूसुद्धा दिलं नाही आम्हाला!’’ स्वाती सांगत होती, ‘‘आयडियलच्या गल्लीत मेहता इस्टेटमध्ये दीड खोलीच्या चाळीत राहिले मी वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत. बापू, दादा, आई, मी आणि राजकमल, ललितकलादर्श यांच्यासाठी सेट्स करणारे आमचे आजोबा म्हणजेच पु. श्री. काळे अर्थात अण्णा, ज्यांच्यामुळे ‘पडद्याला टाळी’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. साधं वातावरण घरात. आई बापूंचा प्रेमविवाह. व्यास संगीत विद्यालयात झालेल्या ओळखीचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झालेलं. बापू आर्किटेक्चरचं शिक्षण घेता घेता अण्णांना मदत म्हणून साडय़ा विकायचे. आईचे वडील शिक्षक. अतिशय कडक स्वभावाचे. त्यांच्या घरी साडय़ा विकायला म्हणून बापू जायचे. साडी घेण्याची ऐपतही नव्हती आणि शक्यताही नव्हती आईकडच्यांची, पण तरी एखादी साडी ते तिथे ठेवून यायचे आणि मग ती साडी परत करायला आई बापूंकडे यायची. भेटण्यासाठीची ही एक युक्ती शोधून काढली होती त्यांनी. नंतर आईचं लग्न ठरलं. पत्रिकासुद्धा छापून झाल्या, पण त्या काळात धाडसानं आईनं आपल्या वडिलांना या प्रेमाबद्दल सांगितलं आणि मग आई आणि बापूंचं लग्न झालं. तेव्हा बापूंना नोकरी नव्हती, शिक्षण सुरू होतं. अण्णांना पंचवीस रुपये पगार होता. तेव्हा खूप होते ते!’’
वपुंच्या पहिल्या कथकथनाचा किस्सा सांगताना स्वाती म्हणाली, ‘‘कौटुंबिक सहल काढली होती आम्ही सिंहगडावर. त्यावेळी चार-पाच वर्षांची होते मी. त्यांनी ‘करंजी’ कथा नुकतीच लिहिली होती. सगळ्यांनी ती सांगण्याचा आग्रह केला. ती चार-पाच पानांची कथा चक्क पाऊण तास रंगली. अनेक माणसं जमा झाली होती तेव्हा. ते हसत होते. एन्जॉय करत होते. आपण कथाकथन करू शकतो हे बापूंना तेव्हा जाणवलं असावं. मुख्य म्हणजे ‘मोठी माणसं बोलत आहेत, तेव्हा तुम्ही आत जाऊन बसा!’ असं बापू कधीही म्हणायचे नाहीत. अगदी नॉनव्हेज जोक्स असले तरी बापू म्हणायचे, ‘मुलं हसली तर समजू ती मोठी झाली, नाहीतर निर्विकारच राहतील ना त्यांचे चेहरे!’ साहित्य सहवासमध्ये दहाव्या वर्षानंतर आम्ही राहायला आलो. तिथे अरविंद गोखलेंशी माझी खूप छान ओळख झाली. दहावी-अकरावीत मी थोडं थोडं लिहायला लागले होते. माझं लिखाण मी बापूंना पहिल्यांदा आणि नंतर अरविंद गोखलेंना वाचून दाखवायचे. ते गमतीत बायकोला म्हणायचेसुद्धा, ‘माझी मैत्रीण आली आहे गं. तिच्यासाठी काहीतरी चांगलं खायला कर बघू!’ त्यांचं वय तेव्हा जवळ जवळ साठीचं होतं.
स्वाती हे सांगत होती तेव्हा मला वाटलं, मोठय़ा वृक्षाच्या सावलीत छोटय़ा रोपांची वाढ खुंटते हे बऱयाच जणांना माहीत असतं, पण आचरणात आणणं अनेकांना जमत नाही. मोकळं आकाश, त्या आकाशातून बरसणाऱया पावसाच्या धारा, सूर्याच्या तीव्र झळा यांना सामोरं जाण्याची ताकद वपुंनी स्वातीला दिली. म्हणूनच तिची जगण्याची आस कित्येक वादळांना परतवत तेवत राहिली. त्यातूनच ‘अनाहत’, ‘उत्खनन’, ‘गोल गोल राणी’, ‘नानक सूर संगीत एक धून’, ‘व.पु. शब्दचित्र’ , ‘मीरा श्यामरंगी रंगली’, ‘हिजडे’, ‘पवित्रम’ अशी विषयांचं वैविध्य असणारी, कल्पनाविलासाबरोबरच अभ्यासपूर्ण विवेचन करणारी शब्दचित्रं, अनुवाद अशा साहित्य प्रकारांना न्याय देणारी, सशक्त एकटाकी लेखणी स्वातीच्या रूपात जन्माला आली. ती म्हणाली, खऱया अर्थानं मी लिहायला लागले लग्नानंतर. खरं तर घरातलं वातावरण खूपच वेगळं होतं. नवरा राजन युको बँकेत, शिवाय युनियन सेक्रेटरी, राजकारणी आणि माझा राजकारणाशी तीळमात्रही संबंध नाही. मला ते आवडत नाही. नोकरी करण्याचाही माझा पिंड नाही, पण लग्नानंतर ती मला करावीच लागली. तीन वर्षांत आठ नोकऱया बदलल्या मी. कारण माझं मन रमायचंच नाही नोकरीत. कुणाच्याही हाताखाली काम करणं मला आवडत नव्हतं. कधीच! आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी कमवणं गरजेचं होतं म्हणूनच जायचे नोकरीला, पण जाताना मुलांना पाळणाघरात ठेवून जायचं जीवावर यायचं. मग एक दिवस सोडलीच नोकरी कायमची. त्या दिवशी घरात वादळ झालं, आर्थिक गणितं कशी बसवायची यावरून. मग कामवाली बाई काढली, इस्त्रीला कपडे देणं बंद केलं. खर्चात कपात केली. मामा ट्रान्सपोर्टमध्ये होता. त्यानं तोच बिझनेस करायचा सल्ला दिला, पण गाडी घ्यायला पैसे पुठे होते? दरम्यान, मनूला म्हणजेच मुलीला ‘कळत नकळत’ चित्रपटाची ऑफर आली. तिचं मानधन, बापूंनी केलेली मदत आणि आमचं थोडंफार सेव्हिंग यातून सेकंडहॅण्ड गाडी घेतली. कंपन्यांमध्ये माझी इंट्रोडक्शन द्यायचे मी. मग काम मिळायचं. जम बसला हळूहळू. कधी कधी ड्रायव्हर नसेल तर राजन स्वत ड्राईव्ह करायचा नोकरी सांभाळून. पंधरा वर्षांचा स्ट्रगल होता तो साधारण. आम्ही सर्व्हिस उत्तम दिली. त्यामुळे कामं मिळत गेली. हा बिझनेस मी एकटीनं सांभाळला. मुलांचा अभ्यास, शाळा, खाणं पिणं. फोनही नव्हता घरात. काम मिळवायचं म्हणजे फोन तर करायलाच हवेत ना. मग त्यासाठी मुलांना घेऊन पब्लिक बुथवर जायचं, पंधरा-वीस फोन करायचे सकाळ-संध्याकाळ. यातच दिवस संपायचा. ‘कळत नकळत’साठी मनूला अवॉर्ड मिळालं तेव्हा घरात फोन आला, पण आतासारखा मोबाईल नव्हताच तेव्हा. त्यामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत मी मात्र घरात बंदिस्त झाले. कुणाकडून कधीही फोनवर विचारणा होईल तेव्हा आपण घरात असलं पाहिजे ना..’’
स्वातीचे यजमान राजन अधूनमधून आमच्या गप्पांमध्ये येणाऱया ‘नॉटी’ या 17 वर्षांच्या पामेरियनला बाहेर घेऊन जात होते. त्यांना स्वातीविषयी विचारलं तर म्हणाले, ‘‘तिच्यात अनेक गुण आहेत. लेखन, अभिनय याबरोबरच ती उत्कृष्ट गाते, चित्र काढते, स्वयंपाक छान करते. तिनं केलेली साबुदाण्याची खिचडी तिच्या हाताला चव असण्याची साक्ष देतच होती म्हणा. स्वातीचा लेखन प्रवास तिच्या अंतर्मनाला उतरवणारा. आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायची आणि चुकांमधून शिकत प्रगल्भतेची एकेक पायरी चढायची, हे करताना वर्तुळ पूर्ण होतं आणि आशा-अपेक्षांच्या पलीकडची मनशांती मिळते हे सांगणारी स्वातीसारखी सद्भावनांशी मैत्री करणारी मैत्रीण या भेटीमुळे मला मिळाली ही माझ्या आयुष्यानं मला दिलेली अनपेक्षित आनंददायी भेट होती खरी!
























































