लेखकाच्या घरात…समृद्ध करणारा 23 घरांचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष

 चं. प्र. देशपांडे…ज्येष्ठ लेखक, नाटककार बँकेतली नोकरी, हस्तरेषांचा अभ्यास, त्यांची लेखणी अशा विविध वळणवाटांतून समृद्ध होत गेली.

‘नातं’ ही चं. प्र. देशपांडे यांची एकांकिका मी पूर्वी केली होती. त्यांच्याच लिखाणामागची ऊर्मी जाणून घेता येईल असं वाटलंसुद्धा नव्हतं. पण अतर्क्य, अनपेक्षित गोष्टींनी आयुष्य विणलं जातं. म्हणूनच जगणं सुंदर होतं ही माझी धारणा चं.प्रं.शी बोलताना अधिकच दृढ झाली. ते म्हणाले, ‘मानवी संबंधात विचार आणि बुद्धीचा उपयोग शून्य आहे. प्रत्येकाच्या मनाचं प्रोग्रामिंग वेगळं असतं. त्यामुळे व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणूनच रिलेशनमध्ये घर्षण असतंच… आणि त्यावर बौद्धिक, वैचारिक सोल्युशन नसतं. फक्त वैयक्तिक पातळीवरच नाही, तर देशा-देशातल्या संबंधातसुद्धा हेच दिसतं. मी बुद्धिप्रामाण्यवादी नाही. त्यामुळे अमूक एक प्रकारचं वागलं की, माणसाचं भलं होईल वगैरे पद्धतीचं लेखन मी कधीच केलं नाही.’ जगण्याची मूल्ये एकापेक्षा जास्त असतील, तर जगण्याचीच वाट लागते असं त्यांचं म्हणणं. त्यांचं ‘सामसूम’ नावाचं नाटक नीती आणि न्याय या दोन मूल्यांची टक्कर दाखवणारंच आहे. त्यांचं म्हणणं असं की, समजा नीती हे एकच तत्त्व पाळायचं ठरवलं, तरी आपल्या मनातच मुळात असलेल्या दोन प्रवाहांची टक्कर होतेच. जसं की व्यभिचार करू नये हे सांगणारं एक मन आपल्यावर नियंत्रण ठेवतं आणि त्याचवेळी संधी मिळाली तर व्यभिचार करायला हरकत नाही, असं दुसरं मन सांगत असतं. अशावेळी कोणत्याही मनाचं ऐकायचं ठरवलं तरी संघर्ष सुरू होतोच मनात.  मी जगण्याच्या प्रक्रियेत मला झालेलं आकलन व्यक्त करण्यासाठी लिहितो. घरातल्याही माणसांची जगण्याची उद्दिष्टे वेगवेगळी असतात. त्यातून होणारं घर्षण ज्या घरात कमी होतं ते समजूतदार घर असतं असं ते म्हणाले.

चं.प्रं.ची बँकेची नोकरी. निरनिराळ्या गावात, खेडय़ात बदली. त्यासाठी घराचा सगळा बाडबिस्तारा घेऊन वारंवार केलेली स्थलांतरं. एकूण 23 घरांतून आजवर झालेला प्रवास. बँकेची नोकरी करून लेखनासाठी काढलेला वेळ. या सगळ्यांना समजून घेणारी पत्नी आणि मुलं यांनी चं.प्रं.च्या घराला त्यांच्या ‘घर’ या संकल्पनेतलं घरपण दिलं. त्यांचं नाटय़ वर्तुळ त्या निमित्तानं अनेकांची होणारी वेळी अवेळी ऊठबस, रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या चर्चा, त्यावेळी बायकोनं समजूतदारपणे दिलेली साथ त्यांना खूप महत्त्वाची वाटते. घाईघाईनं ऑफिसला जाताना लिहून अर्धवट ठेवलेले कागद न आवरता गेलो, तर त्यातला एकही कागद इकडचा तिकडे झालेला नसायचा. हा मुलांचा समजूतदारपणा अधोरेखित करताना त्यांचा 23 घरांचा प्रवासही त्यांनी सांगितला. ‘माझं पहिलं घर विजापूर. कर्नाटकातलं. मराठीपेक्षा कानडी जास्त चांगले यायचं मला. तिथली माझ्या आयुष्यावर प्रचंड परिणाम करणारी गोष्ट म्हणजे डांग्या खोकला. जो गेलाच नाही. त्यातून दमा सुरू झाला. हे आजारपण कित्येक वर्षे टिकलं. लहानपणापासून विचारात पडायला कारणीभूत ठरलेली ही घटना. वाटायचं असं असतं का आयुष्य? वडील शिक्षक. त्यांना मुंबईत पार्ले टिळक विद्यालयात नोकरी मिळाली.

मालाड पश्चिमेला आम्ही राहायला आलो. एकटेपणा, आत्मकीव यात गुंतलेला असायचो मी. कारण आजारपण. ‘मी आहे’ हे सिद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन आणि लेखन असं वाटलं मला. भरपूर हिंदी चित्रपट पहाणं हे करमणुकीचं साधन होतं माझं. पडद्याला चिकटून बाकडं असायचं. ती जागा पकडायला आधीच्या शोच्या मध्यंतरात रांगेत जाऊन उभा राहायचो. पहिली कविता सतराव्या वर्षी केली. इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये होतो. शंकर वैद्य होते शिकवायला. त्यांना कविता दाखवली. त्यांनी मराठी वाङ्मय मंडळात कार्यक्रम ठेवला. एम.ए.ची मुलगी माझ्या कवितांचा अभ्यास करून तिथे बोलली. चिं. त्र्यं. खानोलकर, शांता शेळके अशी थोर मंडळी, शंकर वैद्यांकडेच भेटली. पुण्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियात नोकरी लागली. अनेक ठिकाणी बदल्या झाल्या त्यात कोल्हापूर सगळ्यात आवडलेलं गाव. अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार यांचा तिथे ग्रुप होता. मी नाटक लिहिण्याच्या अगोदरच प्रसन्न कुलकर्णीनं जाहीर करून टाकलं होतं की, या वर्षी राज्य नाटय़ स्पर्धेत चं.प्रं.चं नाटक करणार. त्या माझ्यावरच्या प्रचंड विश्वासामुळेच ‘एक गगनभेदी किंचाळी’ हे पहिलं नाटक लिहून झालं. माझ्या घरातच ‘प्रत्यय’ या संस्थेची स्थापना झाली आणि ते नावसुद्धा मी सुचवलं. ‘दिनकर पुरोहितचा खून’ हे दुसरं नाटक प्रकाश बुद्धिसागरनं दिग्दर्शित केलं तेही तिथेच लिहून झालं. दूरदर्शननं एक स्पर्धा घेतली होती. महाराष्ट्रातल्या 85 संघांनी त्यात भाग घेतला होता. तेव्हा ‘नातं’ हा दीर्घांक लिहिला.’

‘नातं’ कशी सुचली ते सांगताना ते म्हणाले, ‘टीव्ही वर्तमानपत्र आणि आजूबाजूच्या घटनांचे पडसाद उमटतच असतात मनावर. पती-पत्नीच्या नात्यात काही विशिष्ट आडाखे आहेत की, पतीनं पत्नीचं रक्षण करावं वगैरे. वाटलं नातं कंडिशनल असेल म्हणजे अमूक एक केलं तरच नातं टिकतं वगैरे तर अशा नात्यांचा धांडोळा घेतला पाहिजे. म्हणून एक भयंकर सिच्युएशन घेतली की, बायकोवर बलात्कार झाला तेव्हा नवरा पळून गेला. मग म्हटलं बघूया काय होतंय ते. लिहायला लागल्यावर जाणवलं कुठल्याच गोष्टीत तथ्य नाहिये. मी वास्तववाद घेतो आणि जगणं कसं ऍबसर्डिटीनं भरलेलं आहे ते दाखवतो. याच्या अवेअरनेसमध्येच त्यातून सुटका आहे असं मला वाटतं. खूप गावं, माणसं बघितल्यामुळे माझ्या विचारात लवचिकता आली हे तर नक्कीच. जळगावच्या लोहारा या ठिकाणी बदली झाली तेव्हा दोन खोल्यांचं घर मी आधीच निवडलं होतं. त्यात जो कडबा साठवलेला होता तो मी राहायला येण्यापूर्वी साफ करून द्यायचं मालकांनी कबूल केलं होतं, पण बायकोसह ट्रकमधून प्रवास करत तिथे गेल्यावर मालक म्हणाला, आता भाडय़ानं घर देण्याचा विचार आम्ही कॅन्सल केला आहे.

मग रात्री तत्काळ दुसरं घर शोधलं. ते धाब्याचं होतं. तिथे रात्री उंदीर धावायचे छतावरून. एकदा एका उंदराला सापानं पकडलेलं बघितलं आणि माझं धाबं दणाणलं. मग तत्काळ घर बदललं. काही घटना आयुष्यात अशा घडल्या की आपल्याच बाबतीत असं का घडतंय हे प्रश्न पडले. त्यातूनच हस्तरेषांचा अभ्यास केला. सात-आठ वर्ष जगातले सगळे पामिस्ट वाचले. लक्षात आलं की, हस्तरेषा ही अंधश्रद्धा नाही. आयुष्यात जे घडणार ते हातावर उमटलेलं असतं यात काही शंका नाही, पण या अभ्यासात लेखन, वाचन बंद झालं होतं. म्हणून हस्तरेषांचा अभ्यास करणं बंद म्हणजे बंद करून टाकलं. बँकेत काम करून फावल्या वेळात कधी रात्री जागून, कधीही रजेच्या दिवशी लिखाण करत राहिलो. कारण खेळाडूंना जशा सवलती बँकेतून मिळतात तशा लेखकांना मिळत नाहीत. मला पडलेल्या प्रश्नांची उकल करताना जाणवलेल्या गोष्टी सांगण्याचं पॅशन होतं म्हणून माझ्याकडून लिखाण झालं. पुण्यातल्या घरामध्ये घरमालकाशी झालेल्या वादातून पोलीस कम्प्लेंटपर्यंत मजल गेली आणि ‘धागेदोरे’, ‘वस्तू’ या कलाकृतीत पोलीस इन्स्पेक्टर या पात्राची रचना झाली. मुलं मार्गी लागल्यानंतर नोकरी सोडली. खूप मेहनतीनं सगळ्या लिखाणाचं संगणकीकरण केलं. त्यातून वेबसाईट तयार झाली. आज त्यावर माझं सगळं साहित्य मोफत उपलब्ध आहे. लेखकाचं घर असं माझं घर कधीच नव्हतं. दोन पोती भरून पुस्तक होती ती बदलीच्या गावी घेऊन जायचो. पोत्यातच ठेवायचो. वेगळी जागा देऊ शकलो नाही त्यांना कधी. थोडक्यात न लेखकाचं असं माझं घर. न नाटय़ासारखं.’

आता मात्र त्यांची स्वतंत्र खोली आहे जी लेखकाची खोली वाटावी अशीच आहे. पुस्तकं, संगणक, संदर्भ ग्रंथ, पुरस्कार यांनी भरलेली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या बाबतीत असं म्हणतात की, ते नाटकाचा तिसरा अंक पहिल्यांदा लिहू शकतील इतकी त्यांची नाटकाची बांधणी डोक्यात पक्की असायची. पण ‘पुढच्या पानावर काय लिहिणार हेदेखील मला माहिती नसतं. इतकंच कशाला एखादा विनोद जर माझ्याकडून लिहिला गेला, तर तो लिहिता लिहिता पहिल्यांदाच वाचल्यासारखा मी हसतो’ असं चं.प्र. म्हणाले तेव्हा त्यांच्या लेखणीच्या उत्स्फूर्ततेचं उत्तर मिळालं. चं.प्रं.शी बोलताना अतर्क्य गोष्टी अनपेक्षितपणे आयुष्यात येण्याची खात्री इतकी समजूतदार झाली की, अनेक प्रश्नांच्या जंजाळात अडकून आलेली अस्वस्थता खरोखरच दूर पळाली.