सूर ताल – अंतरीचा आवाज…

>>किरण खोत

सोनेरी चंदेरी विश्वातील चित्रपटात किंवा टीव्हीवरील एखाद्या वाहिनीवर जेव्हा आपण एखादा अभिनेता, अभिनेत्री, नर्तक किंवा गायकाला पाहिल्यावर तुमच्या मनात निदान एकदा का होईना, हा प्रश्न निर्माण झालाच असेल की मीसुध्दा एक चांगला कलाकार कसा होऊ शकतो? माझ्यात एक चांगला गायक, वादक, नर्तक किंवा अभिनेता लपलेला आहे का? मित्रहो, एक चांगला कलाकार बनण्यासाठी किंवा कोणतीही कला शिकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या अंतरीचा आवाज ऐकावा लागतो.

इतर कलांसारखंच संगीत शिकणं अगदी सोपं आहे. संगीत कोणाला स्वतच्या आवडीसाठी तर कुणाला इतरांसमोर ते सादर करण्यासाठी शिकावंसं वाटतं. कुणाला त्यात करिअर करायचं असतं, तर कुणाला ते आपल्यापुरतंच आपल्या समाधानासाठी शिकायचं असतं. तर कुणाला आपली कला लोकांसमोर सादर करायची असते. इच्छा असली की मार्ग सापडतोच! तेव्हा निदान एकदा का होईना आपल्या मनातल्या या भावनेला प्रत्यक्षात उतरवायला हवं आणि एकदा आजमावून पाहायला हवं की आपल्या आत ती कला, तो कलाकार आहे की नाही. एक चांगला कलाकार बनण्यासाठी टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं. आपण पुढाकार घेऊन ती कला शिकू शकतो की नाही हे पडताळून पाहणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझा आवाज चांगला आहे, मला एखादं वाद्य वाजवता येऊ शकतं, एखादं नृत्य छान पद्धतीने सादर करू शकते तर त्यांनी पहिलं पाऊल उचलायला हवं. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निदान त्या कलेशी निगडित असलेला एखादा छोटासा ऑनलाईन कोर्स जॉईन करून स्वतला पडताळून पाहायला हवं किंवा जवळपास असणाऱया एखाद्या अकादमीमध्ये प्रवेश घेऊन निदान तीन महिन्यासाठी प्रयत्न करून नक्कीच पाहायला हवं. लक्षात ठेवा आपल्या अंतरीच्या कलाकाराला न्याय देण्यासाठी पहिलं पाऊल हे तुम्हालाच उचलायचं असतं. जर अमिताभ बच्चन, लता मंगेशकर किंवा इतर कोणत्याही तत्सम कलावंतानी हा आत्मविश्वास दाखवला नसता तर आज ते प्रगतीच्या शिखरावर पोहोचले नसते. म्हणूनच आपला छंद जोपासण्यासाठी किंवा एक यशस्वी कलाकार होण्यासाठी आपल्याला ओळखायला हवा तो आपल्या अंतरीचा आवाज…

(लेखक आवाज संगीत विद्यालयाचे संस्थापक आहेत)