
यवतमाळ नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकनाची सूचना जारी केली आहे. या कर आकारणीबाबत मालमत्ता करधारकांचे काही आक्षेप असतील तर ते त्यांनी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीची मुदत 7 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर करण्यात आली आहे. नगर परिषद क्षेत्रातील कर वाढविल्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. वाढीव करांसारखे महत्त्वाच्या विषयावर जनतेचे प्रतिनिधी, लोकांनी निवडून दिलेले राजकारणी आणि अधिकारी यांनी एकत्र बसून सोडवणे गरजेचे असते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून नगर परिषदेची निवडणूक न झाल्याने, या नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.
नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकन सूचना वितरित केली असून यामध्ये मालमत्ता करात मोठी वाढ सुचवण्यात आली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी या करवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. युवासेनेने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना भेटून हा अवाजवी मालमत्ता कर कमी करा अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला असून जर ही प्रस्तावित करवाढ कमी झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



























































