डेंजरस इयर एंडिंग! डिसेंबर 2017 – 26 मृत्यू, 2018 – 21 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत आग लागून जीवितहानी होण्याचे सत्र सुरूच असून गेल्या दोन वर्षांत फक्त डिसेंबरमध्ये 47 जणांनी जीव गमावला आहे. यात गेल्या वर्षी साकीनाका येथील भानू फरसाणमध्ये 19 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 12 मजुरांना जीव गमवावा लागला होता तर 29 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिलमधील पबमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा जीव गेला होता. तर या वर्षी डिसेंबरच्या आगीत 21 जणांना प्राण गमवावे लागले आहे.

या वर्षी डिसेंबर महिन्यात 9 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यात 2 डिसेंबर रोजी महालक्ष्मी येथील 18 मजली इमारतीला आग लागून महिलेचा मृत्यू झाला, तर 17 डिसेंबर रोजी अंधेरीच्या कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. कांदिवलीच्या दामू नगरमधील कपडय़ाच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार जण दगावले. 27 डिसेंबर रोजी चेंबूरच्या टिळक नगरमधील सरगम सोसायटीत लागलेल्या आगीत पाच जण ठार झाले. तरीदेखील आगीचे सत्र सुरूच असून 29 डिसेंबर रोजी वरळीच्या साधना टेक्सटाईल मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 12 जवान जखमी झाले.

सहा जवानांवर उपचार सुरूच!
वरळीच्या साधना टेक्सटाईल मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत जखमी झालेल्या 12 जवानांपैकी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केईएम रुग्णालयातील सहा जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.