
लातूर तालुक्यातील बाभळगाव शिवारामध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मयताचे हातपाय बांधून कमरेला दगडाने भरलेली पिशवी बांधून कॅनलच्या पाण्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराने बाभळगाव परिसरात खळबळ उडाली.
प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील शेत गट नंबर 10 मध्ये असणाऱ्या कॅनलच्या पाण्यात एका युवकाचा मृतदेह निदर्शनास आला. अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाच्या या युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्याच्या हाताला पायाला गुडघ्याला कपड्याने बांधण्यात आले. एका पिशवीमध्ये दगड बांधून ती पिशवी मयताच्या कमरेला बांधण्यात आली. आणि त्यानंतर मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आला. मयत युवकाची ओळख पटलेली नव्हती. मयताचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला व मयताची ओळख पटवणे यासाठी पोलीस तपस करत आहेत. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी उत्तम देवके यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































