
विजय जोशी । नांदेड
सरकार पातळीवर दुष्काळ जाहीर करण्यात आला, पण उपाययोजनांच्या नावाने शंख आहे. कर्जमाफीचाही घोळ संपलेला नाही. शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे सरकार मदत करेल की नाही याचा विचार न करता शिवसेना मदतीसाठी धावून आली आहे. परिस्थिती गंभीर आहे. पण धीर सोडू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे, अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.
नांदेड जिल्हय़ातील वरवंट, नवरदेववाडी, तुप्पा, काकंडी तसेच हिंगोली जिल्हय़ातील साळवा, कांडली, तोंडापूर येथे आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱयांशी संवादही साधला. यावेळी नांदेड, हिंगोली संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, जयप्रकाश मुंदडा, विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील, जिल्हा संघटक दयाल गिरी, युवासेनेचे सचिव वरुण सरनाईक, सिद्धेश कदम, युवासेना कोअर कमिटीचे विपूल पिंगळे, डॉ. गणेश राजे भोसले, विस्तारक अमित गीते, जिल्हा समन्वयक बाबुराव कदम, नगरसेवक बालाजी कल्याणकर, जिल्हा युवा अधिकारी माधव पावडे, महेश खेडकर, कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह नांदेड, हिंगोली जिल्हय़ातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
काकंडीमध्ये अंधारात भाषण
नांदेड तालुक्यातील काकंडी येथे सायंकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱयांना मदतीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात समाजकंटक व्यत्यय आणण्याची शक्यता असल्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र पोलीस व प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. कार्यक्रमाच्या अगोदरच समाजकंटकांनी गावातील विद्युत जनित्र फोडून टाकले. मात्र आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी हजारोचा जमाव अंधारात बसून होता. आदित्य ठाकरे यांनी अंधारातच शेतकऱयांना मदतीचे वाटप केले.
शेतकऱ्यांची आस्थेवाईक चौकशी
कांडली, ता. बाळापूर येथील अवधूत भारती यांच्या शेतात जाऊन तेथील पिकांची बिकट अवस्था त्यांनी पाहिली. उभे पीक आता वाळून गेले आहे. अशा परिस्थितीत कसे जगायचे, अशा भावना तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱयांनी व्यक्त केल्या. यावेळीदेखील तेथील शेतकऱयांना आदित्य ठाकरे यांनी धीर दिला. गावाच्या कडेला असलेल्या नामदेव विठ्ठलराव पानपट्टे यांच्या झोपडीत जाऊनदेखील त्यांनी त्यांची कुटुंबीयांची विचारपूस केली.




























































