
गोराई येथील मँग्रोव्ह पार्कचे काम पूर्ण झाले असून ते अद्याप नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. हे उद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले व्हावे यासाठी युवासेनेने अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रशासन त्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आज संतप्त युवासैनिकांनी तीव्र आंदोलन करत उद्यान तत्काळ नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी केली.
मँग्रोव्ह पार्क खुले करण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान युवासेनेच्या वतीने प्रतीकात्मक उद्घाटन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर, संतोष राणे, शुभदा शिंदे, मनाली चौकीदार, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, धनश्री कोळगे, सिद्धेश शिंदे, नगरसेवक सचिन पाटील, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मिलिंद साटम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































