इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तुम्ही साधा पक्षी तरी मारलाय का?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. बांगलादेश निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत खरगे यांनी भाजपवर हल्ला चढवला. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, तुम्ही साधा पक्षी तरी मारला का? असा बोचरा सवाल खरगे यांनी केला. ते छत्तीसगडमध्ये बोलत होते.

काँग्रेसने 70 वर्षात काय केलं याचा हिशोब मागणाऱ्या भाजपला मल्लिकार्जुन खरगे यांनी आरसा दाखवला. भिलाई कारखाना काँग्रेसने बनवला. मोठे-मोठे धरणं काँग्रेसने बांधली. मोदी घालतात त्या कपड्यांचे कारखानेही काँग्रेसने बनवले. कपडे आमचे, शाळा-कॉलेजही आमचेच, आणि याच शाळेत शिकून हे आम्हाला विचारतात 70 वर्षात काँग्रेसने काय केले? असा टोला खरगे यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावेळी संसदेत केलेल्या भाषणाचाही खरगे यांनी समाचार घेतला. संसदेमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींचा उल्लेख करून लोकांना भ्रमित केले जात आहे. गरीबांचे पोट भरणारा अन्न सुरक्षा कायदाही काँग्रेसनेच आणला. 1962 ला चीनसोबत झालेल्या युद्धाचा उल्लेख करणाऱ्यांना पाकिस्तानचे दोन तुकडे कोणी केले हे माहिती नाही का? इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. तिथे लोकशाही स्थापन केली. तुम्ही साधा एक पक्षीच मारू शकत नाहीत. डोंगर फोडून एखादा उंदीर काढताय आणि त्यांचीच जाहिरात करताहेत. आम्ही पाकिस्तानसोबत लढून बांगलादेशची निर्मिती केली, असेही खरगे यावेळी म्हणाले.

खरेगी यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी मणिपूरला कमी महत्त्व दिले. ते तिथे जायला घाबरतात. मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी भिरीभिरी फिरत आहेत, अशी टीका खरगे यांनी केले.

मोदींनी मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी काहीही केले नाही. ते फक्त ब्लेम गेम खेळत आहेत. काँग्रेसला दुषणे देऊन मणिपूरमधील हिंसाचार थांबणार आहे का? संसदेमध्येही मणिपूर विषयावर दोन-तीन शब्द बोलले. तेही आपल्या भाषणाच्या एकदम शेवटी, असा टोलाही खरगे यांनी लगावला.