
चीनमधील शांघाय देशात शनिवारी रात्री कोविड लॉकडाऊनविरोधात निदर्शने करण्यात आली. याविषयीचे व्हिडियोही सोशल मिडियाद्वारे शेअर करण्यात आले. या व्हिडियोमध्ये लोकं कोरोना निर्बंधांविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. कोरोना निर्बंधांदरम्यान उरुमकी येथील एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत 10 लोकांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झाले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी अतिशय नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कोरोनासंदर्भात घातलेल्या कडक निर्बंधात शिथिलता आणण्याची मागणी करून मोठ्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरले.
उरुमकी रोडवरील लोकांनी शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) विरोधात निदर्शने केली. या लोकांनी ‘कम्युनिस्ट पार्टी को हटाओ’, ‘कम्युनिस्ट पार्टी, पोस्ट छोडो’ आणि ‘शी जिनपिंग, सत्ता छोडो’ अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
शांघायमधील निदर्शनांबाबत अनेक ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये उरुमकी रोडवर जमलेल्या लोकांनी घोषणा दिल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलकांनी ‘मला पीसीआर चाचणी करवून घ्यायची नाही’, ‘आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे’ आणि ‘लॉकडाऊन संपवा’ अशा घोषणा दिल्या. आंदोलकांच्या या घोषणांचा प्रतिध्वनी रात्री उशिरापर्यंत दूरदूरपर्यंत ऐकू येत होता. ‘झिरो कोविड पॉलिसी’ला कंटाळलो आहेत, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.
यावेळी शांघायमधील निषेधाच्या ठिकाणी लोकं आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. शांघायमधील घटनास्थळी पोलिसांनी आंदोलकांना घेरले आणि काही महिलांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शांघायमधील निदर्शनातून जे घडले ते अविश्वसनीय असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत ट्विटर यूझर्सचे म्हणणे आहे की, उरुमकी रोडवरील लोकं कम्युनिस्ट पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी घोषणा देत आहेत. चीनसारख्या कम्युनिस्ट देशात अशा घोषणांचा प्रतिध्वनी क्वचितच ऐकायला मिळतो.



























































