ऑनलाईन प्रवेशात सीबीएसई दहावीच्या निकालाची प्रतीक्षा कशासाठी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश हे ऑनलाईन होत आहेत. हे विभाग वगळता राज्यात इतर ठिकाणी अकरावीची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीबीएसई, आयसीएसईसह इतर केंद्रीय बोर्डाचे दहावीचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशात 10 टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे अकरावीच्याच ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभाग केंद्रीय बोर्डांच्या निकालाची प्रतीक्षा करीत असून सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेशाच्या गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अकरावीची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या असून आजपासून प्रवेश अर्ज विक्री सुरू झाली आहे. 21 जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी, 22 जुलै पहिली गुणवत्ता यादी, 28 ऑगस्ट दुसरी तर 3 ऑगस्टला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. हे ऑफलाईन प्रवेश देताना सीबीएसई, आयसीएसईसह इतर केंद्रीय बोर्डांचे दहावीचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अकरावीत ऑफलाईन प्रवेश घेणाऱया एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई, पुणे, नागपूरसारख्या प्रमुख शहरात राहणाऱया दहावीच्या विद्यार्थ्यांचा मात्र अकरावी प्रवेशाचा प्रवास लांबला आहे.

अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

– मुंबई – 2,77,879
– पुणे – 90,852
– नागपूर – 31,714
– नाशिक – 25,083
– अमरावती – 10,531