
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱया दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपरपूर्वी अर्धा तास आधीच परीक्षा हॉलमध्ये पोहोचावे लागणार आहे. उशिरा आल्यास परीक्षा दालनात ‘नो एण्ट्री’चा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असून, परीक्षा काळात गैरप्रकार केल्यास होणाऱया शिक्षेची सूचीही जाहीर करण्यात आली आहे.
यावर्षी बारावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च व दहावी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा मंडळाने विशेष सूचना जाहीर केल्या असून, तसे पत्र शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सकाळ सत्रामध्ये 10.30 पर्यंत, तर दुपारच्या सत्रात 2.30 पर्यंत परीक्षा दालनात उपस्थित राहावे लागणार आहे.
परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचनांची सूची विद्यार्थ्यांना देऊन त्यावर त्यांची सही घ्यावी, ती प्रत विद्यार्थ्यांनी दप्तरात बाळगावी. तसेच, प्रत्येक पेपरला ओळखपत्र व प्रवेशपत्र आवश्यक आहे. तसेच कोरोना काळातील सर्व सवलती यावर्षी रद्द करण्यात आल्याचेही परीक्षा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





























































