
मुंबई-राज्यासह देशात कोरोना रुग्णवाढ सुरूच असून एकाच दिवसात 11 हजार 692 नवीन रुग्ण आढळले असून 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासांता कोरोनामुळे पाच जणांना तर मुंबईत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.
देशात फेब्रुवारीअखेरपासून पुन्हा एकदा रुग्णवाढ सुरू झाली आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ सुरू आहे. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. आज झालेल्या मृतांमध्ये एकटय़ा केरळमध्ये झालेल्या मृतांचा आकडा 9 इतका आहे. दरम्यान, देशात आज एका दिवसात 10 हजार 780 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 66 हजार 170 इतकी झाली आहे. देशात सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.67 टक्के असून चाचण्यांच्या प्रमाणात बाधित आढळण्याचे प्रमाण 5.09 टक्के आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 229739 चाचण्या करण्यात आल्या तर 3647 कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले.
दिवसभरात…
देश 11692
राज्य 993
मुंबई 226
राज्यात 993 नवीन रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासांत 993 नवे कोरोनाबाधित आढळले असून पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1147 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र नव्या रुग्णांमुळे राज्यात सध्या 5970 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, अनेक देशात सध्या कोरोना वाढत असल्यामुळे मुंबई, नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांत 3 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 91 कोरोनाबाधित आढळले आहेत.
आठ राज्यांना केंद्राचा अलर्ट
> देशात वाढत असणाऱया कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे देशात कोरोना स्थिती गंभीर असणाऱ्या आठ राज्यांना केंद्राकडून अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आठ राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.
> कोरोना वाढत असल्यामुळे नियंत्रण यंत्रणा सक्षम करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, तामीळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा आणि नवी दिल्ली या आठ राज्यांत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सतर्क करण्यात आले आहे.
> कोरोना रुग्णसंख्या दररोज अपडेट करावी, कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

























































