
चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खाणाखुणा चंद्रपुरात सापडतात. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले यांची राजवट चंद्रपूर जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत. आता नव्याने चंद्रपूरच्या इतिहासात भर पडली आहे. कारण चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर हे घराच्या कामासाठी खोदकाम करत होते. शौचालयाच्या बांधकामासाठी खड्डा खोदत असतांना त्यांना एक काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. कारण तो केवळ दगड नसून ते श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होते. हे शिल्प सापडल्याची बातमी परिसरात पसरताच येथे गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.
यावेळी या मूर्तीला दुग्धभिषेक करण्यात आला. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून ती चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासकांच म्हणणं आहे. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. गावात श्रीकृष्णाची मूर्ती सापडल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. हे शिल्प काळ्या दगडावर कोरलेल आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेल आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकतो असे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.



























































