
राज्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवीन बसेस खरेदी केल्या आहेत. नगर विभागाला त्यांतील 17 बसेस उपलब्ध झाल्या आहेत.
दळणवळणासाठी गोरगरीब व मध्यमवर्गीय जनता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पसंती देतात. मात्र, खासगी प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून एसटीचा रुबाब कमी झाला. त्यामुळे पूर्वीसारखे उत्पन्न मिळणे अवघड झाले. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक तोटय़ात सापडले. कोरोना संसर्गाने यात आणखी भर टाकत महामंडळाचे आर्थिक कंबरडे मोडले. नवीन बसेसची खरेदी थांबली. आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी काही बसेसचे मालवाहतूक गाडय़ांमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यामुळे बसेसची संख्या कमी होऊन काही फेऱया बंद करण्याची वेळ आली.
आता महामंडळाने टाटा कंपनीकडून काही बसेसची खरेदी केली. नगर विभागाला पहिल्या टप्प्यात 20 बसेस मंजूर केल्या आहेत. त्यांपैकी 17 नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी आणि फेऱयांची परिस्थिती लक्षात घेऊन तारकपूर आगाराला 10 आणि संगमनेर आगारासाठी सात नवीन बसेस दिल्या जाणार आहेत.
आणखी 30 बसेस येणार
दुसऱया टप्प्यात टाटा कंपनीच्या आणखी 30 नवीन बसेस नगर जिह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या बसेसची टेक्नॉलॉजी नवीन आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी टाटा कंपनीच्या कर्मचाऱयांकडून महामंडळाच्या 40 चालकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.



























































