प्रियकराने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, मित्रांसोबत व्हिडीओ केला शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । निझामाबाद

एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन प्रियकराला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. सदर मुलगा हा १७ वर्षांचा असून त्याने मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला असून तो त्याच्या मित्रांना देखील पाठविला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर मुलाला अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलमध्ये मुलीचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो व व्हिडीओ आढळून आले आहेत.

सदर मुलगी ही १४ वर्षांची असून ती तिच्या आईसोबत निझामाबाद शहरात राहते. या मुलीचे वडील आखाती देशात कामाला आहेत. सदर मुलीची काही महिन्यांपूर्वी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाशी ओळख झाली. त्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यावेळी या मुलाने मुलीसोबत चुंबन घेतानाचे सेल्फी काढले होते. त्यानंतर तो मुलगा मुलीकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. मात्र मुलीने नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे एकमेकांसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील सेल्फी व्हायरल करण्याची धमकी त्या मुलीला दिली. त्यामुळे मुलीने सेक्ससाठी होकार दिला. २५ एप्रिल रोजी मुलीच्या घरी कुणी नसताना त्या मुलाने मुलीवर बलात्कार केला. तसेच बलात्कार करतानाचा त्यांचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. हा मुलगा एवढ्यावरच न थांबता त्याने त्यांचा हा व्हिडीओ मित्रांसोबत शेअर देखील केला होता.

काही दिवसांपूर्वी या मुलीचे वडील सुट्टीनिमित्त घरी आले होते. त्यावेळी त्यांना मुलगी शांत शांत राहत असल्याचे दिसून आले तसेच मुलीच्या मोबाईलवर व घरच्या फोनवर सतत ब्लँक कॉल येत असल्याचे देखील निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला भेटून व्हिडीओ व फोटो डिलीट करण्यास सांगितले. मात्र त्याने तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.