करपेवाडीत अल्पवयीन मुलीची धारधार शस्त्राने हत्या; पाटण तालुक्यात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटण

ढेबेवाडी विभागातील पाटण तालुक्यातील करपेवाडी गावच्या हद्दीत एका ऊसाच्या शेतात भाग्यश्री उर्फ सोनू संतोष माने या अल्पवयीन मुलीची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. ही घटना मंगळवारी उघड झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ढेबेवाडी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे ढेबेवाडीसह तालुक्यात खळबळ माजली आहे.

ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील भाग्यश्री उर्फ सोनू संतोष माने (वय 17) ही तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात 12 वीत कला शाखेत शिक्षण घेत होती. तसेच ती तळमावले येथील एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासासाठी भाग्यश्रीने कामावरून सुटी घेतली होती. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला गेली होती. दुपारपर्यंत घरी आली नाही म्हणून आई, आजी व घरच्या लोकांनी तिचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यावेळी करपेवाडीतून तळमावलेकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याजवळील शेतातील शिवारामध्ये भाग्यश्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे उत्तमराव भजनावळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करून पोलीस पुढील तपास करत आहेत.