
पाकिस्तानातील पूरग्रस्त सिंध प्रांतात एक वाहन पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला. या अपघातात 12 मुलांसह 20 जणांचा मृत्यू झाला. महिला आणि लहान मुलांसह अनेक भाविक एका कारमधून राज्यातील खैरपूर येथून सेहवान शरीफकडे जात होते. तरी अचानक खैरपूरजवळील सिंधू महामार्गावर पुराच्या पाण्यासाठी बनवलेल्या खड्ड्यात ही प्रवासी व्हॅन पडली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही व्हॅन खैरपूर जिल्ह्यातून प्रवाशांना घेऊन सेहवान येथील प्रसिद्ध सुफी दर्ग्याकडे घेऊन जात होती. यावेळी रस्त्यात असणाऱ्या 30 फूट खोल खड्ड्यात ही व्हॅन पडली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 महिन्यांपासून या खड्ड्यात पाणी साचलेले होते. दरम्यान पोलिसांनी बचावकार्य करून व मृतदेह बाहेर काढून सेहवान शरीफ येथील सय्यद अब्दुल्ला शाह इन्स्टिट्यूटमध्ये पाठवले आहेत. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात पुरामुळे हाहाकार माजला होता. यावेळी अनेक ठिकाणी पाण्याचे भलेमोठे खड्डे तयार झाले होते. हा खड्डा न बुजवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.





























































