हरिश्चंद्रगडावर कल्याणचे 20 ट्रेकर्स अडकले; एनडीआरएफ मदतीला धावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कल्याण

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेले कल्याणचे 20 ट्रेकर्स वाट चुकल्यामुळे गडावरच अडकले आहेत. कोकणकडा येथे एक हजार फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या तुकडीला धाडले आहे. मात्र प्रचंड अवघड वाट आणि अंधार यामुळे मदतकार्य थांबवले असून सर्व ट्रेकर्सना आजची रात्र कोकणकडय़ावरच काढावी लागणार आहे.

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे सकाळी 20 जणांसोबत हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. गडापासून पुढे दीड किलोमीटरवर असलेल्या कोकणकडा येथून ट्रेकिंग करून परतत असताना हे सर्व फसले. सायंकाळी डॉ. अडवाणी यांनी जिल्हा प्रशासनाला मदतीसाठी फोन केला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तत्काळ या ट्रेकर्सची सुखरूप सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाठवले, मात्र अंधार पडल्याने मदतकार्य थांबवले असून या सर्व ट्रेकर्सना कोकणकडय़ावरच रात्र काढावी लागणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारीदेखील बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

ट्रेकर्समध्ये पाच महिला
डॉ. अडवाणी यांच्यासोबत पाच महिला व 17 पुरुष आहेत. कोकणकडय़ापासून खाली एक हजार फूट सर्वजण आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. जिल्हाधिकाऱयांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांनादेखील या घटनेविषयी कळविले असून कल्याण तहसीलदार अमित सानप या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

summary- 20 trekkers stuck at harishchandragad