आताच सुरू करा पुढच्या वर्षीच प्लानिंग, जाणून घ्या 2023 मधल्या सुट्ट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते ती सुट्ट्यांची. नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे दोन महिने शिल्लक असल्याने सगळ्यांच्याच नजरा 2023 मध्ये किती व कोणत्या सुट्ट्या आहेत याकडे लागून राहिल्या आहेत.

पुढील वर्षी म्हणजेच 2023 ला अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्या या मधल्या दिवसांमध्ये आल्या आहेत. त्यामुळे दोन ते चार दिवस लांब सुट्ट्यांचं नियोजन करत असाल तर ते थोडे कठिणच आहे. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा गुरुवारी आला असल्याने अनेकांना ही एकच सुट्टी मिळणार आहे, मात्र ज्यांना शनिवार रविवार अशा सुट्ट्या असतात ते शुक्रवारची एक सुट्टी टाकून लाँग विकेंड प्लान करू शकतात. फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र 18 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी असून छत्रपती शिवाजी महाराज जयंती  (तारखेप्रमाणे) रविवारी आली आहे. त्यामुळे अनेकांच्या या हक्काच्या दोन सुट्टया गेल्या आहेत.

मार्च महिन्यात शनिवार, रविवार सुट्टी असलेल्यांनी सोमवारी होळीची एक सुट्टी घेतली तर लागूनच मंगळवारीही रंगपंचमीची सुट्टी आली आहे. अशावेळी मार्च महिन्यात सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन करु शकता. 10 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 22 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. एप्रिल महिन्यात 7 एप्रिलला गुड फ्रायडे तर 8 एप्रिल आणि 9 एप्रिल रोजी शनिवार-रविवार येत असल्याने हे तीन दिवस सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. 29-30 एप्रिल शनिवार येत असून 1 मे सोमवार येत असल्याने तीन दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करु शकता. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. यावेळी नरक चतुर्दशी रविवारी आल्याने अनेकांची ही सुट्टी गेली आहे. 10 ते 15 नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, 12 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन, 14 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. डिसेंबर महिन्यात शनिवार -रविवारची सुट्टी असलेल्यांना 25 डिसेंबर सोमवार असल्याने सलग तीन सुट्ट्या मिळणार आहेत.

यंदाचा 31 डिसेंबर दणक्यात

यंदा 31 डिसेंबर शनिवारी आला  असल्याने यंदा तो दणक्यात साजरा होणार यात काही शंकाच नाही. 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला रविवार असल्याने अनेक जण शुक्रवार संध्याकाळपासूनचाच प्लान आखतील