
उत्तर प्रदेशमधील सहरानपूर जिल्ह्यातील तुरुंगात तब्बल 24 कैदी HIV बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या कैद्यांचे रिपोर्ट तुरुंग प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठवले आहेत. तसेच तुरुंगात एड्स पसरण्याचे कारणही शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहरानपूर तुरुंगात एकूण 2200 पेक्षा जास्त कैदी आहेत. त्यातील काही जणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टीबीची लक्षण दिसत होती. त्यासाठी 15 जून ते 21 जून दरम्यान या तुरुंगात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबीरात कैद्यांची एड्सची चाचणी देखील करण्यात आली होती.
मंगळवारी या एड्स चाचणीचे रिपोर्ट आले. त्यात एका महिलेसह 24 जणांचे एड्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आधीच या तुरुंगात पाच एड्सग्रस्त कैदी आहेत. आता एड्स ग्र्स्त रुग्णांची संख्या एकूण 29 वर पोहोचली आहे.
गेल्या पाच महिन्यात तुरुंगात दोन वेळा आरोग्य शिबीर घेण्यात आले आहे. त्याचे आता रिपोर्ट आले असून 24 रुग्ण एचआयव्ही बाधित आढळले आहेत. तुरुंग प्रशासन आता या कैद्यांना एड्सची बाधा कशी झाली असेल याचा शोध घेत आहे. तसेच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राज्य ए़ड्स नियंत्रण सोसायटी व एंटी रेट्रो वायल थेरपी सेंटरला कळविण्यात आले आहे, असे नोडल अधिकारी डॉ. रणवीर सिंह यांनी सांगितले.
























































