मुंबईत दिवसभरात 25 नवे गोवरबाधित, एकूण रुग्णसंख्या 371 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दिवसभरात गोवरबाधित 25 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 371 वर झाली आहे. तर दिवसभरात 78 संशयित रुग्णांची नोंद झाल्याने संशयित रुग्णांची संख्या 4,433 वर पोहोचली आहे.

गोवर प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये संशयितांना ‘अ’ जीवनसत्त्व गोळय़ांचे वाटप करण्यात येत असून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी विशेष लसीकरण मोहीमही राबवण्यात येत आहे.

आतापर्यंत 63 लाख 21 हजार 637 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आज 33 जण रुग्णालयात दाखल झाले, तर 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, गोवरमुळे आतापर्यंत 15 मुलांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तीन मुले मुंबईबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हे भाग गोवर हॉटस्पॉट
मुंबईत गोवरचा प्रसार वाढत असून झोपडपट्टी भागात रुग्णवाढ सर्वाधिक आहे. मुंबईत भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळत आहेत.