
सामना प्रतिनिधी । कराड
सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे व प्रख्यात सरोद वादक पं. निभंजन भट्टाचार्य या नामवंताच्या सहभागाने 28 आणि 29 जानेवारीला प्रीतिसंगम संगीत महोत्सव रंगणार आहे. हिंदुस्थानात शास्त्रीय संगीताला मोठी परंपरा आहे. या कलेला जगभरात अत्यंत मानाचे स्थान आहे. अभिजात शास्त्रीय संगीत आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कराड व परिसरातील ग्रामीण भागात या कलेचे उपासक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना या क्षेत्रातील दिग्गाज व नामवंताची कला पहायला व अनुभवायला मिळाली तर त्यांच्या संगीत साधनेला योग्य दिशा मिळेल. या हेतूने 19 वर्षांपासून सातत्याने प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
आजपर्यंतच्या महोत्सवात ख्यातनाम गायिका आशा भोसले, पं. जयराज, पं. किशोरी आमोणकर, पं हरीप्रसाद चौरसिया, पं. एन. रानमं, पं. अजय पोहनकर , पं. अरविंद मुळगावकर, पं. विश्वमोहन भट्ट, पं. राजन व साजन मिश्रा, संगीतकार नौशाद, पं, मालीनी राजूरकर, देवकी पंडीत, आरती अंकलीकर-टिकेकर, शर्वरी जमेनीस, पं. तरूण भट्टाचार्य, पं. प्रभाकर कारेकर, पं, व्यंकटेशकुमार, पं. जयतिर्थ मेउंडी, पं. हिमांशू नंदा, पं. रोणु मुजुमदार, आशा देशातल्या अत्यंत प्रतिभा संपन्न दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे प्रीतिसंगम संगीत महोत्सवाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
या वर्षांचा संगीत महोत्सव 28 व 29 जानेवारीला सौ. वेणुताई चव्हाण सांस्कृतीक सभागृहात होणार आहे. या महोत्सवाची सुरूवात सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने होणार आहे. ठुमरी व दादरा या वैशिष्ठपूर्ण गायिकेचा लाभ रसिकांना मिळणार आहे. त्यांना हणमंत फडतरे- तबला व उदय कुलकर्णी –संवादीनी यांची साथ संगत लाभणार आहे. 29 जानेवारीला ख्यातनाम सरोद वादक पं. निभंजन भट्टाचार्य, कलकत्ता यांचे सरोद वादन होणार आहे. हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य होत आहे. रसिकांनी उत्फूर्त प्रतिसाद देवून या नामवंत कलाकारांच्या कलाविष्काराचा रसिकांनी अस्वाद घ्यावा, असे आवाहन जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी केले.



























































