
मुंबई महापालिका शिक्षण विभागाशी संलग्नित 33 टक्के पालकांनी कोरोनानंतर पाल्याला शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. पालिकेशी संबंधित महापालिका तसेच खासगी अनुदानित-विनाअनुदानित शाळांमध्ये मिळून एकूण 8 लाख 24 हजार 874 विद्यार्थी शिक्षण घेत असून यातील 2 लाख 75 हजार 958 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑफलाइन शाळा नको असे मत पालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणात मांडले आहे.
शहरातील 5 लाख 49 हजार 916 विद्यार्थ्यांच्या पालकांनीच म्हणजेच 66.6 टक्के पालकांनीच पाल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शाळेत पाठविणार असल्याचे सांगितले आहे. 1 ते 10 मार्चदरम्यान राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणात 3 ते 18 वयोगटातील बालकांच्या कुटुंबाची सर्वसाधारण माहिती घेण्यात आली. मुंबई महापालिकेशी संलग्नित शाळांमध्ये 8 लाख 22 हजार 948 बालके दाखल असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. तर विशेष गरजा असलेल्या बालकांची संख्या 11 हजार 613 एवढी असून त्यांपैकी 11 हजार 566 बालके शाळेत दाखल असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
कोरोनानंतरची शाळा
ऑनलाइन शिक्षणाला हजेरी लावणारे महापालिकेशी संबंधित विद्यार्थी
पहिली ते पाचवी 5,90,988
सहावी ते आठवी 1,02,554
नववी, दहावी 33,783
पालकांची ऑनलाइन शिक्षणाला पसंती
मुंबईतील 2 लाख 74 हजार 958 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन शिक्षणाला पसंती दिली आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थी हे खासगी शाळेत शिकणारे असून त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणासाठी डिजिटल व्यवस्था उपलब्ध असल्याचे मत पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी नोंदविले आहे.






























































