
सामना प्रतिनिधी। देगलूर/मुखेड
नांदेड येथे झाडावर वीज पडल्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात दोन सख्या बहीण भावंडांचा समावेश आहे. पहिली घटना आडोदेगलूर तालुक्यातील केदारकुंठा येथे घडली तर दुसरी घटना कंधार तालुक्यातील पेठवडज ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या चुडाजीचीवाडी येथे घडली आहे. विक्रम उद्धव मुंडकर (२७) व मारोती केशवराव बाराळे (५०), हेमंत लवसिंग जाधव (१०) आणि शालिनी लवसिंग जाधव (८) अशी मृतांची नावे आहेत.
कंधार येथे पाऊस येत असल्याने विक्रम गुरांना गोठ्यात बांधण्यासाठी गेला होता. त्याचवेळी अचानक विज गोठ्यावर पडली. यात विक्रमचा जागीच मृत्यू झाला तर जवळच उभी असलेली त्याची काकू इंदुबाई गोविंद मुंडकर (५०) गंभीर जखमी झाली आहे.
दुसरीकडे देगलूर तालुक्यातील काही भागात चारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत होता. त्यावेळी तालुक्यातील केदारकुंठा येथील शेतकरी मारोती केशवराव बाराळे हे शेतात काम करीत होते. पावसाचा जोर वाढल्याने ते झाडाखाली जाऊन थांबले. त्याचवेळी झाडावर वीज पडली त्यात बाराळे यांचा मृत्यू झाला अशी माहिती तहसीलदार वसंत नरवाडे यांनी दिली.


























































