
सामना ऑनलाईन । श्रीनगर
अनंतनागमधील श्रीगुफारामध्ये आज सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात एक पोलीस शहीद झाला आहे, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये इस्लामिक स्टेट जम्मू अॅण्ड कश्मीरचा म्होरक्या दाऊदचाही समावेश आहे.
अनंतनागमधील श्रीगुफारामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत इस्लामिक स्टेट जम्मू ऍण्ड कश्मीरचा म्होरक्या दाऊदसह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, तर एक पोलीस शहीद झाला आहे. या करवाईदरम्यान स्थानिकांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एक नागरिक ठार झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे, असे जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले.
तीन जिह्यांत इंटरनेट सेवा बंद
सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीनगर, अनंतनाग आणि पुलवामा जिह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुलवामामध्येही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागातही शोध महीम सुरू केली आहे. कश्मीर खोऱयात तणाव वाढू नये यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


























































