
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया मियावकी वनीकरण पद्धतीत मुंबईत 43 ठिकाणी घनदाट वने बहरली आहेत. जपानी पद्धतीच्या या वनांमध्ये 50 पेक्षा विविध प्रकारची 2 लाख 21 हजार 405 प्रकारची झाडे वाढली आहेत. तर आणखी 15 ठिकाणी नागरी वनांची कामे प्रगतिपथावर आहेत.
मुंबईत वनक्षेत्र वाढवण्यासाठी कमीत कमी जागेत आणि कमी वेळात वाढणारी मियावकी वने वाढवण्यात येत आहेत. गेल्या वर्षी प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मियावकी वनांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या रोपांची वाढ वेगाने होत असून या झाडांनी 5 ते 7 फुटांची उंची गाठली आहे. यामध्ये चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, आवळा, कदंब आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
अशी बहरली वने
मियावकी वने कमी जागेत आणि कमी वेळेत वाढणारी असून कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्ये असणाऱया अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर आधारित आहे. दोन वर्षांत विकसित होणाऱया या वनांमधील झाडांमध्ये कमी अंतर असल्याने ती घनदाट असतात. सध्या बहरलेल्या 43 पैकी 14 वने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’मधून साकारण्यात आली आहेत.

























































