उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली ४७ ठार, ११ जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,डेहरादून

उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिह्यात आज सकाळी ९ वाजता बस २०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४७ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. ही बस भौनहून रामनगरकडे जात असताना धुमाकोटजवळ पिपलीधौन मार्गावर क्वीन्स पुलावरून बस खोल दरीत कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गढवाल मोटर युजर्सच्या या बसमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच राज्य आपदा निवारण पथकाचे जवान तीन हेलिकॉप्टर्सने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.

अपघात एवढा भीषण होता की बस दरीत कोसळल्यानंतर तिचे दोन तुकडे झाले. बचाव पथकाने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वारसांना दोन लाखांची मदत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अपघातातबाबत दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची भीषणता जास्त आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच मृतांच्या वारसांना दोन लाखांची आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.