कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला, अपघात झाला; 5 ठार

car-accident

कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह पाचजणांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास यवतमधील शेरु ढाबा परिसरात हा अपघात घडला.

सिद्धेश्वर चंद्रकांत बर्डे (वय 55), अनिता सिद्धेश्वर बर्डे (वय 40), श्वेता सिद्धेश्वर बर्डे (वय 23), शोभा शरणगोडा पाटील (वय 38) आणि संतोष मल्लीनाथ पाटील (वय 38) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कंटेनरचालक अमोल विलास शिंदे (सांगली) याला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरणगोडा सुभाराव पाटील (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्डे कुटुंबीय पुण्यातील कोंढवा परिसरात राहायला होते. कामानिमित्त ते सोलापूरातील नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर काल मध्यरात्री बाराच्या सिद्धेश्वर त्यांची पत्नी अनिता, मुलगी श्वेता, बहीण शोभा आणि संतोष काल रात्री मोटारीतून सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास यवत गावाजवळील शेरु ढाब्यानजीक परिसरातून पुढे जात होते. त्यावेळी कंटेनरचालक अमोलने रस्त्यामध्ये अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सिद्धेश्वर यांची मोटार कंटेनरला धडकली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सिद्धेश्वर यांच्यासह पत्नी अनिता, मुलगी श्वेता, बहीण शोभा, संतोष गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जवळच्या यवतच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

यवत गावच्या हद्दीत आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि मोटारीच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात कंटेनरचालकाने ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, संपूर्ण अपघाताची चौकशी सुरू असून नेमका अपघात कसा झाला याबाबत माहिती घेतली जात आहे, असे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या