5 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकेच पोहोचली नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

शालेय पाठय़पुस्तकांना जोडलेल्या वह्यांच्या पानांचा उपयोग विद्यार्थी कसा करतात हे पाहण्यासाठी बालभारतीने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने पुस्तकातील कोऱ्या पानांचा उपयोग होत असल्याचे समोर आले असले तरी अद्याप सर्वेक्षणातील 4.88 टक्के विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठय़पुस्तकेच मिळाली नसल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात 22 हजार 193 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, यातील 1 हजार 83 विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकेच मिळालेली नाहीत.

बालभारतीच्या वेबसाईटवर वह्यांच्या कोऱ्या पानांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठय़पुस्तकांचा सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला आहे. एकूण 22 हजार 193 विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 110 (95.12 टक्के) विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठय़पुस्तके मिळाल्याचे यात म्हटले आहे, तर 16 हजार 386 विद्यार्थ्यांना एकूण 4 पाठय़पुस्तके मिळाली. 844 विद्यार्थ्यांना तीन, 3 हजार 729 विद्यार्थ्यांना दोन तर 1 हजार 234 विद्यार्थ्यांना आतापर्यंत केवळ एकच पाठय़पुस्तके देण्यात आली. त्यामुळे 73.84 टक्के विद्यार्थ्यांनाच एकात्मिक पाठय़पुस्तके योजनेंतर्गत चार पाठय़पुस्तके आतापर्यंत मिळाली असल्याचे समोर आले आहे.

दप्तराचे ओझे अंशतः कमी झाले

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 38.25 टक्के पालकांनी एकात्मिक पाठय़पुस्तकांमुळे दप्तराचे ओझे अंशतः कमी झाल्याचे म्हटले आहे, तर 21.93 टक्के पालकांनी दप्तराचे ओझे तेवढेच असल्याचे सांगितले. 14 हजार 356 पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. पुस्तकातील कोऱ्या पानांवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदी 93.72 टक्के पालक पाहतात, तर 46.41 टक्के पालकांच्या मते विद्यार्थी या पानांचा वापर स्वयंअध्ययनासाठी करत असल्याचे सांगितले.

 22,193विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

  • 6.49 टक्के विद्यार्थी वर्गात वह्यांच्या पानांवर नोंदी घेतात. 3.51 टक्के विद्यार्थी या पानांचा वापर करीत नाहीत.
  • 14 हजार 960 विद्यार्थी सर्व विषयांसाठी रोज या कोऱ्या पानांचा वापर करतात.
  • 13.69 टक्के विद्यार्थी कधी तरीच या पानांचा वापर करतात.
  • महत्त्वाचे मुद्दे लिहिण्यासाठी सर्वाधिक या पानांचा वापर होता. 19.58 टक्के विद्यार्थी जे सुचेल ते या पानांवर लिहितात.
  • 10 हजार 312 विद्यार्थ्यांनी सर्वच कोऱ्या पानांवर नोंदी लिहिल्या आहेत.
  • एकात्मिक पुस्तके हाताळणे सोपे असल्याचे 92.35 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.
  • 3.88 टक्के विद्यार्थ्यांच्या मते शिक्षकांनी या नोंदी पाहिलेल्याच नाहीत.
  • तर 1.01 टक्के विद्यार्थ्यांना ही पुस्तके आवडलेली नाहीत.