52 हजार युवकांचे लोकसभेला प्रथमच मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणुकीच्या नगर जिल्ह्याच्या अंतिम मतदारयादीमध्ये 18 ते 19 या वयोगटातील मतदारांची संख्या 51 हजार 879 एवढी आहे. या युवकांना लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला होता. त्यानुसार तयार करण्यात आलेली अंतिम मतदारयादी 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात 33 लाख 93 हजार 88 एवढे मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 या वयोगटातील मतदारांची संख्या 51 हजार 879 एवढी आहे. अंतिम मतदारयादीमध्ये नाव असलेल्या मतदारांपैकी 20 ते 29 च्या दरम्यान 6 लाख 70 हजार 399 मतदारांचे वय आहे. याशिवाय 30 ते 39 च्या दरम्यान वय असणार्‍या मतदारांची संख्या 7 लाख 61 हजार 935 एवढी आहे. मतदारयादीमध्ये 40 ते 49 या वयोगटातील 7 लाख 17 हजार 646 मतदार, 50 ते 59 वयोगटातील 5 लाख 32 हजार 252 मतदार, 60 ते 69 वयोगटातील 3 लाख 40 हजार 676 मतदार, 70 ते 79 वयोगटातील 2 लाख 2 हजार 812 मतदार आणि 80 पेक्षा जास्त वय असलेले 1 लाख 15 हजार 489 मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये असणार्‍या एकूण मतदारांमध्ये 18 ते 39 या दरम्यान वय असणार्‍या मतदारांची संख्या तब्बल 44 टक्के एवढी आहे. तर, 60 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍या मतदारांची संख्या 19 टक्के एवढी आहे.