
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमधील अरारिआ जिल्ह्यात एका 55 वर्षीय व्यक्तीची गुरं चोरल्याच्या संशयातून जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. मोहम्मद काबुल असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांना जवळपास 300 हून अधिक जणांनी मारहाण केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत जमावातील लोकं काबुल यांना लाथा बुक्क्यांनी, काठ्यांनी बेदम मारहाण करत होते व त्याला चोर म्हणत होते.
काबुल हे 29 डिसेंबर रोजी अरारिया जिल्ह्यातील सिमारबानी गावात त्यांच्या तीन साथिदारांसोबत आले होते. त्यावेळी त्यांचे मोहम्मद मुस्लीम नावाच्या व्यक्तीसोबत भांडण झाले. मोहम्मद मुस्लीम काबुल यांच्यावर गुरं चोरल्याचा आरोप करत होता. त्यानंतर मुस्लीमने काही लोकांना बोलावले व काबुलला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने काबूल यांची पँट उतरवली व त्यांना काठ्या व लाथा बुक्क्यांनी बेदम मारले. काबूल हे मारेकऱ्यांना ते चोर नसल्याचे सांगत होते मात्र जमावातील लोकं त्यांना मारतच राहिली. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्व हल्लेखोर तेथून पळून गेले होते.
काबुल यांना मारहाण करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या ओळखीच्या होत्या. त्याच्यातील वादाचे नंतर या भयंकर हिंसाचारात रुपांतर झाले. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे अरारिआ जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. पी सिंग यांनी सांगितले.
























































