कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने उडविली प्रशासनाची झोप; कळंबमध्ये एकाच दिवशी 57 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मार्च महिन्यात झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी तालुका प्रशासनाने लोकांशी संपर्कात येणाऱ्या व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून सराफ व्यापारी तसेच कामगार असे 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने तालुका प्रशासनाची झोप उडाली असून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला आता कडक पावले उचलावी लागणार आहेत.

गेल्या वर्षी कोरोना महामारीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. दैनंदिन कामांचे नियोजन पूर्ण कोलमडले होते. शासनाने लस उपलब्ध करून दिल्याने नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. विवाह सभारंभ, सण, उत्सवात नागरिक सहभागी होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मार्चमध्ये कडक निर्बंध घातले आहेत. तरीही प्रशासनाला अंधारात ठेवत नागरिक कोरोना नियम मोडत असल्याचे दिसत आहे. नागरिकांची हीच बेफिकिरी कोरोना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरली आहे.

गुरुवारी शहरात 57 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याच्या सूचना करण्यात येत असताना नागरिक गांभीर्याने पालन करत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कळंब तालुका कोरोना संसर्गाच्या डेंजर झोनमध्ये येत असून तालुक्याची टाळेबंदीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सराफ व्यापारी व त्याचे कामगार मिळून गुरुवारी रेकॉर्डब्रेक 42 व दैनंदिन तपासणीत 15 असे 57 पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बंद असलेले कोविड सेंटर पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून आयटीआय हॉस्टेलमधील कोविड सेंटर येथे 33 ऍक्टिव्ह होम आयसोलेशनमध्ये 7 असे एकूण 40 तर गुरुवारी कोरोना तपासणीत आढळलेले 57 असे एकूण 97 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

प्रशासनाचे कोरोना तपासणीचे जम्बो नियोजन
शहरातील व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी कोविड तपासणी  8 दिवसात  करून घेणे बंधनकारक केले आहे. शहरातील मन्मथ स्वामी येथे कोरोना तपासणी करण्यात येणार असून  18 तारखेपासून यासाठी  विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले आहे.