फिल्मफेअर सोहळाही गुजरातला पळवला

राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे केंद्र सरकारने गुजरातला पळवल्यानंतर आता बॉलीवूडमधील अत्यंत प्रतिष्ठाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळादेखील गुजरातला पळवला आहे. दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअरचा दिमाखदार सोहळा यंदा पहिल्यांदाच गुजरातला होणार आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात बॉलीवूडचे मोलाचे योगदान आहे. हा पुरस्कार सोहळा गुजरातला पळवून मुंबईची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका होत आहे.

गुजरात टुरिझमच्या सहकार्याने 69 वा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा 28 जानेवारी रोजी गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे, अशी घोषणा सोमवारी जिओ वर्ल्ड सेंटर येथे फिल्मफेअरकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली. 2020 चा अपवाद वगळता आतापर्यंत हा पुरस्कार सोहळा मुंबईतच पार पडला आहे. पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा गुजरातला होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

महाराष्ट्रात येणारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत. यात वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क, मरीन अकॅडमी, हिरे व्यापार, टेस्ला या प्रकल्पांचा समावेश आहे.

मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्रोतावर डल्ला
आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही पळवला गेला आहे. बॉलिवूड हा मुंबईचा अविभाज्य घटक आहे. बॉलीवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे ‘फिल्मफेअर’ पुरस्कार गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्रोतावर डल्ला मारण्यासाठी पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.