
वाढत्या मागणीमुळे मुंबई शहरात जानेवारी 2023 मध्ये 8,694 मालमत्तांची नोंदणी झाली असून यातून राज्याला 658 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालमत्ता सल्लागार ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, 2013 ते 2023 या गेल्या दहा वर्षांतील जानेवारी महिन्यात यंदा दुसऱया क्रमांकाची मालमत्ता नोंदणी झाली आहे.
जानेवारी 2021 या वर्षी रेकॉर्डब्रेक म्हणजेच 10,412 मालमत्तांची नोंदणी झाली होती. कोरोनाकाळातील मुद्रांक शुल्क सवलतीमुळे या काळात सर्वाधिक मालमत्तांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ यंदाच्या जानेवारीत 8,694 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. गतवर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी झालेली वाढ सात टक्के अधिक आहे. जानेवारी 2022 मध्ये 8155 मालमत्तांची नोंदणी झाली होती.




























































