मोकाट कुत्रा चावल्याने ९ वर्षाच्या बालकाचा मृत्यु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

बारूदगर नाल्याजवळ राहणाऱ्या ९ वर्षीय बालकास सहा दिवसापूर्वी कुत्र्याने चावा घेतला. त्यास उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता आज मंगळवारी सकाळी त्या बालकाचा मृत्यु झाला. नूरमोजम खालेद पिंजारी असे त्या बालकाचे नाव आहे. या दुदैवी घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सूरू असून या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यास मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसंबदी करण्यासाठी पुण्याच्या ब्ल्यु क्रॉस एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असली तरी या एजन्सीकडून कुत्रे पकडण्याची कार्यवाही गतीने होत नसल्यामुळे मनपाच्या प्रत्येक सर्वसाधारण सभा व स्थायी समितीची बैठकीमध्ये नगरसेवकांकडून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु कुत्र्यांना पकडण्याची मोहिम प्रशासनाकडून राबविली जात नाही. यापूर्वी सिटीचौक, शहागंज भागात कुत्र्यांनी बालकांना चावा घेवून गंभीर जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कुत्र्यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालमधील व्यक्तींना आणण्यात आले. तरीही त्यांच्याकडून कुत्रे पकडले जात नसल्याचे दिसून आले.

२२ नोव्हेंबर रोजी बारूदगर नाल्याजवळील रहिवासी खालेद पिंजारी यांचा मुलगा नूरमोजम (९) हा घरासमोर खेळत असतांना त्यास मोकाट कुत्र्याने चावा घेतला. कुत्रा चावल्याचे कळताच त्यास घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घाटीतील वॉर्ड क्र. २४ मध्ये उपचार केले जात होते. मात्र उपचार सूरू असतांना मंगळवारी सकाळी १० वाजता त्या बालकाचा मृत्यु झाला. कुत्रा चावल्याने बालकाचा मृत्यु झाल्याचे कळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बालकाच्या घरी जावून त्याच्या कुटुंबियांचे सात्वन केले. यावेळी प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी विजय पाटील हे होते.

बालकाच्या कुटुंबास २५ हजाराची मदत
मोकाट कुत्रा चावल्यामुळे दगावलेल्या बालकाच्या कुटुंबास तातडीने मनपाच्या वतीने २५ हजार रूपयाची मदत महापौर घोडेले यांनी जाहीर केली.

ब्ल्यु क्रॉस संस्थेला बजावणार नोटीस
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे काम पुणे येथील ब्ल्यु क्रॉस संस्थेला देण्यात आले आहे. परंतु या संस्थेकडून कुत्रे पकडण्याची मोहिम राबवली जात नसल्यामुळे कुत्रे चावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. कुत्रे पकडण्याचे काम दिवसा व रात्री करण्याच्या सूचना करूनही या संस्थेकडून कुत्रे पकडले जात नाही. त्यामुळे या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापौर घोडेले यांनी प्रशासनाला दिले.