
सामना ऑनलाईन । मुंबई
विमानाची उड्डाण चाचणी बुधवारीच करण्यात येणार होती, परंतु पाऊस आणि खराब हवामानामुळे ही चाचणी दुसऱ्या दिवशी करण्यात आली. दरम्यान, गुरुवारीदेखील अधुनमधून पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. अशा हवामानातही उड्डाण चाचणी घेण्यात आली.
- २००८ मध्ये अलाहाबाद विमानतळावर विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यानंतर विमान चालवणे बंद करण्यात आले होते.
- २०१३ पर्यंत विमान अशाच स्थितीत होते. त्यानंतर यू. वाय. एव्हिएशनने विमान खरेदी केले.
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार विमान गॅलेक्सी कॉर्पोरेशनच्या नावाने नोंदणीकृत आहे. २०१३ मध्ये विमान यू. वाय. एव्हिएशनने खरेदी केले. चाचणी उड्डाणाआधी अडीच वर्षे या विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
मदतीला धावला अन् जखमी झाला
घाटकोपर विमान दुर्घटनेबद्दल टीव्हीवरून समजले. ते पाहून घाटकोपरच्या माणिकलाल परिसरात राहाणाऱ्या प्रशांत महाकाळ हा २५ वर्षांच्या तरुणाने ताबडतोब घर सोडले आणि जखमींच्या मदतीला धावला, पण मदत करताना विमानाचा पंखा पायाला लागून तळपाय कापल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला धड चालताही येत नाहीये.
विशेष म्हणजे शुक्रवारी त्याच्या नोकरीचा पहिला दिवस होता. मनासारखी नोकरी मिळाल्यामुळे तो खूप खूश होता. पण त्याच्या आदल्या दिवशीच ही दुर्घटना घडली आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. उद्या त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे प्रसादचा लहान भाऊ प्रदीप महाकाल याने सांगितले.
- विमानात तांत्रिक बिघाड असल्याने त्याचे उड्डाण करता येणार नाही असे सुरभीने विमान उड्डाणाआधी आपल्याला फोन करून सांगितले होते अशी माहिती घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मेंटेनन्स इंजिनीयर सुरभी गुप्ता यांचे वडील एस. पी. गुप्ता यांनी सोनापत येथे दिली.
- घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मुख्य वैमानिक प्रदीप राजपूत हे याआधी २००७ मध्ये राजस्थानात झालेल्या एका विमान दुर्घटनेतून वाचले होते, असा खुलासा प्रदीप राजपूत यांचे शेजारी अनिल राजपूत यांनी केला. प्रदीप राजपूत नवी दिल्लीच्या द्वारका सेक्टर-११ मध्ये पत्नी, मुलासोबत राहत होते. ते आधी मर्चंट नेव्हीत होते. त्यानंतर व्यावसायिक विमान कंपनीत काम करायला सुरुवात केली.


























































