
सामना प्रतिनिधी । मुंबई
आयआयटी संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट सुरू व्हायला अजून महिना आहे. तत्पूर्वीच नामांकित कंपन्या आयआयटीमध्ये नोकरीच्या ऑफर्स घेऊन आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्लेसमेंटपूर्वी आलेल्या कंपन्यांची संख्याही जास्त आहे. आयआयटी मुंबईतील 162 विद्यार्थ्यांची नोकरीही पक्की झाली आहे.
दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवडय़ांमध्ये आयआयटी संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा होतो. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्लेसमेंटपूर्वी 142 विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. त्यातील 100 विद्यार्थ्यांनी त्या स्वीकारल्या होत्या. यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत 162 विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी चालून आल्या आहेत. इतरही विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी कंपन्या उत्सुक आहेत.
कॅम्पस प्लेसमेंट अधिकृतरीत्या सुरू झाले नसतानाही ऑफर्स मिळू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद असला तरी आता मिळणाऱया ऑफर्स स्वीकारायच्या की आणखी चांगल्या ऑफर्ससाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करायची असा विचार विद्यार्थी करत आहेत. आयआयटी मुंबईप्रमाणेच देशातील अन्य आयआयटी संस्थांमध्येही विद्यार्थ्यांना आतापासूनच कंपन्या हेरू लागल्या आहेत.
– आयआयटी मद्रासमध्ये गेल्या वर्षी प्लेसमेंटपूर्वीच नामांकित कंपन्यांनी 114 विद्यार्थ्यांची निवड केली होती. या वर्षी तो आकडा 130 वर गेला आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट, ऍनालिटिक्स, कन्सल्टिंग ऍण्ड फायनान्स तसेच कन्झ्युमर गुडस् क्षेत्रातील कंपन्यांकडून अशा प्री-प्लेसमेंट ऑफर्स जास्त येत असल्याची माहिती आयआयटी मुंबईतील प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱयांनी दिली. गेल्या वर्षी आयआयटी दिल्लीतील 180 विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या होत्या. त्यातील 91 विद्यार्थ्यांनी त्या स्वीकारल्या होत्या. यंदा तिथे 151 विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपन्यांनी केली आहे.

























































