राममंदिराबाबत कायदा केला तर तीच अटलजींना खरी श्रद्धांजली ठरेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सरकारने चार वर्षांत जगात सर्वात मोठा ठरेल असा सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभा केला. चार वर्षांत जर 182 मीटर पुतळा उभा राहू शकतो तर राममंदिर का उभे राहू शकत नाही. सरकारसाठी ते शक्य होते. आपल्या सत्ताकाळात सरकारने जर राममंदिर उभे केले असते तर अटलजींना रामाचे दर्शन घेता आले असते. जनतेने जेव्हा बहुमताने तुम्हाला निवडून दिले तेव्हा राममंदिर उभारण्याची सरकारची जबाबदारी आहे. राममंदिराबाबत कायदा केला तर ती अटलबिहारी वाजपेयींना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दांत शिवसेनेने सरकारचे कान टोचले.

राममंदिर हा संस्कार आहे, अस्तित्व आहे, देशाचे अस्तित्व आहे. म्हणून जनतेची राममंदिर झालेच पाहिजे अशीच इच्छा आहे. जनतेने प्रचंड बहुमताने तुम्हाला तिकडे बसवले आहे. तेव्हा राममंदिर हे झालेच पाहिजे असे दिवाकर रावते म्हणाले. सरकारने मनात आणले असते तर राममंदिर उभे राहू शकले असते. जगाला हेवा वाटेल असा हा पुतळा आहे. पण या चार वर्षांत राममंदिराबाबतही सरकारने गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला असता तर पटेलांच्या पुतळ्यासारखेच भव्य राममंदिरही अयोध्येत उभे राहिले असते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आत्म्यालाही भरून आले असते. त्यांनाही रामाचे दर्शन लाभले असते. हे लक्षात घेऊन सरकारने राममंदिराबाबत संसदेत कायदा करावा आणि राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा. अटलबिहारी वाजपेयींना तीच खरी श्रद्धांजली ठरेल असे रावते यावेळी म्हणाले.