
सामना प्रतिनिधी । मेलबर्न
युवा तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह याने शुक्रवारी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सुरुंग लावला. त्याने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांतच गुंडाळला. पहिल्या डावात 292 धावांची दमदार आघाडी घेणार्या टीम इंडियाची दुसर्या डावात पाच बाद 54 धावा अशी अवस्था झाली. मात्र तरीही 346 धावांनी पुढे असणार्या हिंदुस्थानचा संघ तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी फ्रंटफूटवर उभा आहे. तिसर्या दिवशी उभय संघांचे मिळून 15 फलंदाज बाद झाले.
ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 या धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरुवात केले. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहून संघासाठी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्कस हॅरीस व टीम पेन यांनी सर्वाधिक 22 धावा केल्या. उस्मान ख्वाजाने 21 धावा तर ट्रेव्हीस हेडने 20 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 33 धावा देत सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कसोटीत पुनरागमन करणार्या रवींद्र जाडेजाने 45 धावा देत दोन फलंदाज बाद केले. मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
रणजीतील अनुभव मोलाचा
हिंदुस्थानातील खेळपट्ट्या संथ असतात. अशा खेळपट्टय़ांवर ‘स्लोअर वन’ चेंडूचा उपयोग करावा लागतो. याप्रसंगी रिव्हर्स स्विंगचे कसबही आत्मसात करता येते. रणजी, प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अनुभव या वेळी कामाला आला. मेलबर्नच्या खेळपट्टीवर यश मिळाले, असे स्पष्ट मत जसप्रीत बुमराह याने या वेळी व्यक्त केले.
दृष्टिक्षेपात
- जसप्रीत बुमराहने पहिल्याच वर्षी 45 फलंदाज बाद करीत हिंदुस्थानसाठी विक्रम नोंदवला. एका वर्षी परदेशात सर्वाधिक बळी गारद करणारा तसेच पदार्पणाच्या वर्षी सर्वाधिक फलंदाज बाद करणारा तो हिंदुस्थानचा एकमेव अव्वल गोलंदाज ठरला आहे.
- जसप्रीत बुमराहने 33 धावा देत सहा फलंदाजांना बाद केले. या वेळी त्याने ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. याआधी कपिल देव यांनी 1985 साली ऍडलेड येथे 106 धावा देत आठ फलंदाज बाद करीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आपली चमक दाखवली आहे.
- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये एकाच वर्षी एका डावात पाच फलंदाज बाद करणारा जसप्रीत बुमराह हा आशियातील पहिलाच गोलंदाज ठरलाय.
- हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी या वर्षी आतापर्यंत 247 फलंदाज गारद केले आहेत. हाही एक विक्रमच. याआधी 1979 साली हिंदुस्थानने सर्वाधिक 237 फलंदाज बाद केले होते.
- हिंदुस्थानने पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. हिंदुस्थानची ही ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च आघाडी ठरली आहे.
कमिन्सचा प्रभावी मारा
पॅट कमिन्स या तेज गोलंदाजाने दुसर्या डावात आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी केली. त्याच्या भेदक मार्यामुळे हिंदुस्थानवर 54 धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाज गमावण्याची आपत्ती ओढवली. ऑस्ट्रेलियाच्या या उंचपुर्या गोलंदाजाने हनुमा विहारी (13 धावा), चेतेश्वर पुजारा (0), विराट कोहली (0), अजिंक्य रहाणे (1 धावा) यांना झटपट तंबूचा रस्ता दाखवला. जोश हेझलवूडने रोहीत शर्माला पाच धावांवर बाद केले. आता पहिलीच कसोटी खेळणारा मयांक अग्रवाल 28 धावांवर तर रिषभ पंत सहा धावांवर खेळत आहे.




























































